आंदेशे-मांदेडे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; चार-पाच दिवसांत दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

यश नवले | पौड : मुळशी तालुक्यातील आंदेशे-मांदेडे रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, सुमारे सात किलोमीटरच्या या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

आंदेशे-मांदेडे हा तीन गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य काजल मोरे यांनी आंदेशे-मांदेडे रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण रस्त्यावरील दुरवस्थेची पाहणी करून प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रिटीकरण करावे, अशा सूचना दिल्या. पाहणीदरम्यान ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, चार-पाच दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवून आवश्यक काँक्रिटीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य काजलताई मोरे तसेच प्रशासनाकडे केली आहे.

प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण केले नाही, तर ग्रामस्थ व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

See also  बालेवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संविधान पूजन व हळदीकुंकू समारंभाचे 25 जानेवारी रोजी आयोजन