बाणेरमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या पुढाकाराने प्रशासनासोबत संयुक्त पाहणी; प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

बाणेर : बाणेर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्विस रोड अतिक्रमणमुक्त करून त्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे व राहुल कोकाटे यांच्या पुढाकाराने प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत सर्विस रोडची संयुक्त पाहणी करण्यात आली.

बाणेर येथील सर्विस रोडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, या समस्येमुळे वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर सर्विस रोडलगतची अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा आणि सर्विस रोडचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना नगरसेविका मयुरी कोकाटे व राहुल कोकाटे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे, झोन-३ चे कार्यकारी अभियंता मुकुंद बर्वे, उपअभियंता नितीन साबळे, उपअभियंता उमेश सिद्रुक, कनिष्ठ अभियंता विनय एलपाल, आरेखक राहुल माळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या विविध सूचनांची दखल घेण्यात आली. बाणेर सर्विस रोडचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेच्या पथ विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (NHAI) समन्वय साधण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करून सर्विस रोडचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  कात्रज येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य पुस्तक प्रदर्शनाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन