पुणे : बाणेर येथील मित्रनगर कॉलनी परिसरातील सार्वजनिक पदपथावर बिनापरवानगी सुरू करण्यात आलेल्या बोअरवेल खोदकामाविरोधात पुणे महानगरपालिकेच्या पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाने संयुक्त कारवाई करत संबंधितांवर ₹1,09,728 इतका दंड आकारला आहे. तसेच संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील ज्योती सुपर मार्केट, सर्व्हे नं. 110/11/1, मित्रनगर कॉलनी परिसरातील सार्वजनिक पदपथावर बोअरवेलचे खोदकाम सुरू होते. या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडे चौकशी केली असता अशा कोणत्याही कामास परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे खोदकाम बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे समोर आले.
या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील जागरूक नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या पथ विभाग तसेच बाणेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व संबंधित काम तात्काळ बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी खोदकाम सुरू होते त्या पदपथाखालून एमएनजीएलची गॅस वाहिनी गेली आहे. अशा परिस्थितीत खोदकामादरम्यान गॅस वाहिनीचे नुकसान झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या पथ विभाग व क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या संयुक्त कारवाईत संबंधितांकडून ₹1,09,728 दंड करण्यात आला असून, बेकायदेशीर खोदकाम करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक पदपथ, रस्ते व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या अनधिकृत कामांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
— प्रतिनिधी, पुणे बुलेटीन
















