आर्थिक सक्षमीकरणासोबत सामाजिक सक्षमीकरणात बाणेर नागरी पतसंस्थेचा महत्त्वपूर्ण वाटा : आमदार शंकर मांडेकर

पुणे : आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक सक्षमीकरणासाठी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेने सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्थेच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबत सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले जात असल्याचे प्रतिपादन आमदार शंकर मांडेकर यांनी केले.

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्री भैरवनाथ सन्मान व गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, डॉ. दिलीप मुरकुटे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका मयुरी कोकाटे, ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, प्रकाश बालवडकर, शांताराम पाडाळे, गोविंद रणपिसे, लहू बालवडकर, नामदेव गोलांडे, हनुमंत सायकर, पांडुरंग दातार, मारुती कोकाटे, राम गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. दिलीप मुरकुटे म्हणाले की, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजवरच्या यशामध्ये संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद तसेच ठेवीदार यांचा मोठा वाटा आहे. संस्थेने आतापर्यंतचा संघर्ष आणि वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली असून, भविष्यातही आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवत विविध उपक्रम राबविण्यात येतील.

माजी आमदार शरद ढमाले म्हणाले, माणसाचा वैचारिक विकास घडविण्यासाठी अध्यात्माची गरज असते, तर सत्कार आणि गौरवाच्या माध्यमातून सामाजिक विकासाला प्रोत्साहन मिळते. बाणेर नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक विकासासाठीही सातत्याने प्रयत्नशील राहिली आहे.

या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने अॅड. शिवराज कदम, सुभाष हगवणे, सोपानराव बालवडकर, रखमाजी पाडाळे, हनुमंत सोनवणे, गणेश शेडगे, विराज रानवडे, योगेश धनकुडे, गहिनीनाथ कळमकर आणि समीर गायकवाड यांना ‘भैरवनाथ पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर, देहूगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष योगेश काळोखे आणि दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या उपाध्यक्ष वर्षा पांडुरंग थोरवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वर्धापन दिन सोहळ्याला सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड मिळाली.

See also  पुणे चक्राकार महामार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटींचा मोबदला वाटप