बाणेर : मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील युवा शैलेश भगवान शिंदे यांची इंग्लंडमध्ये टाऊन कौन्सिलर (नगरसेवक) पदी निवड झाल्याबद्दल योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बाणेर यांच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच त्यांचे आई वडील छाया व भगवान शिंदे यांचाही याप्रसंगी संस्थेच्या वतीने उचित सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका रोहिणी चिमटे, अभिनव शिक्षण संस्था अध्यक्ष अशोक मुरकुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशराज पारखी आणि संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या शुभहस्ते शैलेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी योगीराज पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीसोबतच संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, “मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेला युवक इंग्लंडमध्ये टाऊन कौन्सिलर म्हणून निवडून येणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शैलेश शिंदे यांच्या या यशाचा संपूर्ण पुणेकर आणि मुळशीकरांना अभिमान वाटत आहे.”
सत्काराला उत्तर देताना शैलेश शिंदे म्हणाले की, भारतीय नागरिक असताना इंग्लंडमध्ये कौन्सिलरपदी निवड होण्याचा हा आपल्या माहितीनुसार पहिलाच इतिहास आहे. आपल्या मातृभूमीत, आपल्या लोकांच्या उपस्थितीत होणारा हा गौरव आपल्यासाठी अत्यंत आनंददायी आणि भावनिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. माझी अपेक्षा एवढीच—माणसाचा सन्मान त्याच्या पदामुळे नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वामुळे, ज्ञानामुळे आणि संघर्षामुळे व्हावा.
कारण पद मिळवणे ही परिस्थितीची देणगी असू शकते; पण ज्ञान मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा स्वतःच्या कर्तृत्वाचा पुरावा असतो.भविष्यात गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भानुप्रताप बर्गे यांनी शैलेश शिंदे यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, ज्या इंग्लंडने भारतावर दीर्घकाळ राज्य केले, त्याच देशात एका भारतीय तरुणाची टाऊन कौन्सिलरपदी निवड होणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
बाळासाहेब काशिद म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार भगवा फडकावला, त्याचप्रमाणे शैलेश शिंदे यांनी इंग्लंडमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. त्यांच्या या यशाचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रकाश बालवडकर आणि यशराज पारखी यांनीही शैलेश शिंदे यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शामराव हुलावळे, दत्तात्रय उभे, प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, नामदेव गोलांडे, सोपान पाडाळे, रामदास मुरकुटे, विजय विधाते, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक गणेश तापकीर, संचालिका वैशाली विधाते, अलका सिरसगे, सहयोगी संचालिका निकिता माताडे, माजी संचालक अमर लोंढे, वसंत माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी केले, तर शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















