पुणे : सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारणारे संतोष पंडित यांच्या अटकेचा आम आदमी पक्षाने तीव्र निषेध केला आहे. “सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारल्याची ही शिक्षा आहे का?” असा सवाल करत पुण्यात लोकशाही मार्गाने प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
संतोष पंडित यांनी रस्ते, सार्वजनिक सुविधा, प्रशासनातील कथित अनियमितता तसेच जनतेच्या पैशांच्या वापराबाबत सोशल मीडिया रील्सच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी किरकोळ स्वरूपाच्या आरोपांवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
“चंद्रकांत पाटील हे पुण्याचे व्हाइसरॉय आहेत का?” असा सवाल करत ‘आप’ने म्हटले आहे की, मंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरसेविका मिताली साळवेकर यांनी स्वतः संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार केलेली नाही. त्यामुळे कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे राजकीय दबावातून आणि आकसापोटी त्रयस्थ व्यक्तीमार्फत दाखल करण्यात आल्याचे दिसते, असा आरोप पक्षाने केला.
अटकेची वेळ आणि पद्धतीवरही ‘आप’ने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रात्री सुमारे १.३० वाजता कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेली अटक कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद असल्याचे पक्षाने म्हटले आहे. तक्रारीत नमूद केलेले कथित आक्षेपार्ह शब्द बोलीभाषेत वापरले जातात; मात्र केवळ अशा शब्दांच्या आधारावर गुन्हा दाखल करून अटक करणे म्हणजे पुण्याला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रकार असल्याची टीका करण्यात आली.
नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या काही कामांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्या प्रभागाचा निधी शून्य करण्यात आल्याचा आरोपही ‘आप’ने केला. त्याचप्रमाणे संतोष पंडित यांनी ओपन जिमच्या कामातील कथित वाढीव बजेट आणि आर्थिक अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले.
“चंद्रकांत पाटील हे जनतेने निवडून दिलेले आमदार आहेत, पुण्याचे व्हाइसरॉय नाहीत. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधी आणि मंत्री म्हणून राजकीय टीका सहन करण्याची सवय लावून घ्यावी. राजकीय टीकेला राजकीय उत्तर द्यावे; यंत्रणांचा वापर करून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबू नये,” असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचाही निषेध
दरम्यान, वाढीव आवाजातील डीजेला विरोध करणारे मत मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीचाही आम आदमी पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पुण्यात कायद्याच्या राज्यापेक्षा झुंडशाही वाढत असल्याची टीका पक्षाने केली.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून, विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मात्र पुण्यात सध्या मुद्द्यांऐवजी गुद्द्यांची लढाई वाढत चालली आहे, ही सुसंस्कृत पुणे शहरासाठी चिंतेची बाब असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.
यावेळी डॉ. अभिजित मोरे (प्रदेश सचिव), अमित म्हस्के (प्रदेश समन्वयक), संजय कोने (प्रदेश संघटक–कामगार आघाडी), आरती करंजावणे (महिला आघाडी शहर अध्यक्षा), सुनीता काळे (माजी शहर अध्यक्षा), माधुरी गायकवाड, सुनील सवदी आणि नितीन कुटे पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.















