गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवा; हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांचे सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन

पौड | प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांची बैठक पौड पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात पार पडली. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी आणि पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाच्या नियोजनासह कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. तसेच वर्गणीच्या नावाखाली नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे गोळा केल्यास संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सोशल मीडियावर वादग्रस्त अथवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत. प्रत्येक गणेश मंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही पुजारी यांनी दिल्या.

पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी गणेशोत्सवात डीजेच्या अनावश्यक वापराला टाळून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. शासनाने निश्चित केलेल्या डेसिबल मर्यादेतच ध्वनीक्षेपक तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरी फरांदे, पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर, पोलीस पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  सुस–म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज DPR कामाचा नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी घेतला आढावाअमृत 2.0 योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन व STP प्रकल्पाला गती