पुणे : भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग फॉर वुमेन, पुणे येथे आयईईई कॉम्प्युटेशनल इंटेलिजन्स सोसायटी विद्यार्थी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रॅक द क्लॉक’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासह संशोधन इंटर्नशिप कार्यक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले.
“कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि नवोपक्रम या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी सतत अद्ययावत राहून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि संशोधनवृत्तीला नवी दिशा मिळते,” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी केले.
‘हॅकाथॉन आणि त्यापलीकडील संधींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा उपयोग’ या विषयावर आयईईई सीआयएसचे अध्यक्ष विराज मकवाना यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधन, प्रकल्प विकास, सादरीकरण आणि संकेतस्थळ निर्मितीसाठी विविध कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा प्रभावी वापर कसा करता येतो याविषयी माहिती दिली.
‘क्रॅक द क्लॉक’ या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, सामाजिक समस्या आणि सर्जनशील संकल्पनांवर आधारित विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. ‘एआय फॉर सोशल गुड’ विभागात टीम नाईटमेअर, ‘फॉर वुमेन, बाय वुमेन’ विभागात द बिगिनर्स, ‘फॉर द मीम्स’ विभागात रनटाईम रिबेल्स आणि ‘सायबर सिक्युरिटी मेड सिम्पल’ विभागात नेक्सोरा या संघांनी प्रथम क्रमांक मिळविला.
याच प्रसंगी आयईईई सीआयएस रिसर्च इंटर्नशिप प्रोग्राम २०२६ अंतर्गत आरोग्य, आर्थिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विविध गटांनी क्रेडिट कार्ड फसवणूक शोध, फिशिंग शोध, हृदयरोग जोखीम अंदाज, वाहतूक कोंडी अंदाज आणि अंतर्गत सायबर धोका शोध यांसारख्या विषयांवर काम केले.
या कार्यक्रमास डॉ. विजया पवार, डॉ. केतकी माळगी, डॉ. श्वेता साळुंखे, डॉ. रुपाली आंबेकर, प्रा. किरण येसुगेडे, डॉ. सुनीता धोत्रे यांच्यासह संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी विद्यार्थिनी आणि आयईईई सीआयएसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















