पुणे, दि. १२ सप्टेंबर २०२६ : पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी रस्ते विकास, रस्ते दुरुस्ती, भूसंपादन, स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या प्रमुख रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वाघोलीतील नाला गार्डनचे कौतुक
वाघोली परिसरातील नाला गार्डनची पाहणी करून आयुक्तांनी येथील विकासकामांची माहिती घेतली. पर्यावरणीय समतोल आणि शाश्वत परिसंस्था जपण्याच्या दृष्टीने नैसर्गिक घटकांचा योग्य वापर करून विकसित करण्यात आलेल्या या जागेचे त्यांनी कौतुक केले.
महापालिकेच्या उपलब्ध जागांचा योग्य वापर करून नागरिकांसाठी अशाच प्रकारच्या हरित आणि मनोरंजनात्मक जागा विकसित करण्याच्या शक्यता तपासण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अशा जागा शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी ‘शहराची फुफ्फुसे’ (Lungs of the City) म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असे आयुक्तांनी नमूद केले.
पाहणीदरम्यान परिसरातील स्वच्छतेचाही आढावा घेण्यात आला. परिसरात नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच स्वच्छतेबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध मिसिंग लिंक आणि प्रमुख रस्ते विकास प्रकल्पांचीही पाहणी करण्यात आली. यामध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश होता :
– शिवणे–खराडी रस्त्यावरील नदीकाठच्या रस्त्याची मिसिंग लिंक.
– ग्रँट रोड–नगर रोड जंक्शनजवळील रस्ता रुंदीकरण.
– वडगावशेरी नदीकाठच्या रस्त्यावरील मिसिंग लिंक.
– वाघोली येथील प्रस्तावित १८ मीटर रुंदीच्या उत्तर–दक्षिण रस्त्याची मिसिंग लिंक.
– नगर रोडच्या उत्तर व दक्षिण बाजूस समांतर असलेले प्रस्तावित प्रादेशिक योजना (RP) रस्ते. हे प्रस्तावित RP रस्ते नगर रोडला अंतर्गत पर्याय ठरणार असून, मेट्रो आणि हमरस्त्याच्या कामादरम्यान वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.
यापैकी काही प्रकल्प भूसंपादनाच्या अडचणींमुळे प्रलंबित असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या प्रमुख रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.
तसेच, इतर प्रस्तावित रस्ते प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि देखभाल कामांचाही आढावा घेण्यात आला. नगर रोडच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रस्ता विभागामार्फत देण्यात आली.परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांची दुरुस्तीची कामेही प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. येत्या १५ दिवसांत प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले.
या पाहणीवेळी उपायुक्त (परिमंडळ क्र. १) आशा राऊत, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे, अधीक्षक अभियंता (पथ) रोहिदास गव्हाणे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.














