भाजीच्या कॅरेटमध्ये मंडप, पिठाच्या गोळ्यापासून गणपती; बाणेरमध्ये चिमुकल्यांचा अनोखा गणेशोत्सव!

बाणेर : गणेशोत्सव हा सामाजिक एकीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. याच भावनेतून बाणेर परिसरातील पॅन कार्ड रोडवरील सुप्रीम अमाडोर सोसायटीबाहेर बालगोपाळांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली. भाजी विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅरेटमध्ये मंडप तयार करून, माती व पिठाच्या गोळ्यापासून साकारलेल्या गणपतीची प्रतिष्ठापना करत या चिमुकल्यांनी गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला.

बालवाडी ते पहिली-दुसरीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांनी एकत्र येत हे छोटेसे गणेश मंडळ उभारले आहे. परिसरातील किराणा मालाच्या दुकानातील कामगार, वॉचमन यांच्या मुलांसह इतर लहान मुलांनी एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा केला. मोठ्या सजावटी, आकर्षक रोषणाई किंवा भव्य मंडप नसतानाही या चिमुकल्यांच्या उत्साहाने परिसरात गणेशोत्सवाचे आनंदमय वातावरण निर्माण झाले.

भाजीच्या कॅरेटमध्ये तयार केलेला मंडप आणि पिठाच्या गोळ्यापासून तयार केलेली गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य ठरले. साधेपणातून भक्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याची भूमिका या छोट्याशा मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वय, आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक स्तर यांचा भेद न करता चिमुकल्यांनी एकत्र येत गणरायाचे स्वागत केले. त्यामुळे या उपक्रमातून सामाजिक एकीकरणाची भावना अधोरेखित झाली.

या चिमुकल्या गणेश भक्तांच्या गणरायाच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार पक्षाचे) कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी भेट दिली. त्यांनी गणरायाचे दर्शन घेत बालगोपाळांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना जयेश मुरकुटे यांनी या छोट्याशा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. मंडळ लहान असले, गणपती पिठाचा असला, तरी समाजाला एकत्र घेऊन चालण्याचा विचार मोठा आहे. अशा उपक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि एकत्रितपणे सण साजरा करण्याची भावना वाढीस लागते, असे त्यांनी सांगितले.

बाणेरमधील या चिमुकल्यांच्या अनोख्या गणेशोत्सवाने भक्तीला भव्यतेची नव्हे, तर एकतेची आणि उत्साहाची जोड आवश्यक असल्याचा संदेश दिला आहे.

See also  संगीत मानापमान अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस