पुणे : डॉ. होमी भाभा रस्त्यावरील सेंट जोसेफ स्कूल, लॉयला स्कूल तसेच पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर विद्यालय (चव्हाणनगर पोलीस वसाहत) परिसरातील स्टीलचा बसथांबा सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या हलक्या पावसात अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुणे शहरातील सर्व बसथांब्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व बसथांब्यांचे तातडीने स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
सदर बसथांबा शाळांच्या परिसरात असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने बसथांबा कोसळला त्यावेळी शाळा सुटण्याची वेळ नसल्याने तसेच पावसामुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.मात्र, केवळ हलक्या पावसात बसथांबा कोसळणे ही गंभीर बाब असून, पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसथांब्यांच्या देखभाल व सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.
शहरातील बसथांबे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे एखादा बसथांबा अचानक कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व प्रकारच्या बसथांब्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करून धोकादायक किंवा कमकुवत बसथांबे दुरुस्त अथवा आवश्यकतेनुसार पुनर्बांधणी करावेत, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त तसेच पीएमपीएमएलच्या संचालकांना निवेदन देण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल आणि मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सुहास निम्हण, निलेश जुनवणे, जयदेव चव्हाण, अंकित पवार, सज्जन नरवडे, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
















