महाराष्ट्र मेडिकल स्टोअरचा शुभारंभ मोठ्या पवित्र कार्याची सुरुवात आहे – भानुप्रताप बर्गे

पुणे : – आजच्या परिस्थितीत हजारो नागरिक विविध गंभीर आजारांनी ग्रासलेले आहेत. या आजारावरील औषधे प्रचंड महागडी आहेत. एक एका इंजेक्शनची किंमत सत्तर हजार, एक लाख रुपये ऐकून गरीबच काय तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते देखील हतबल झालेले आपण दररोज बघतोय, अश्यावेळी ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनने सुरु केलेले भारतातील पहिले चॅरिटेबल मेडिकल ठरणारे महाराष्ट्र मेडिकल स्टोअरचा शुभारंभ ही मोठ्या पवित्र कार्याची सुरुवात आहे, असे गौरवोद्गार मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी महाराष्ट्र मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी काढले.


ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनने पुण्यातील नारायण पेठेतील केसरी वाडा शेजारी महाराष्ट्र मेडिकल स्टोअरची सुरुवात केलीय, यावेळी झालेल्या उद्घाटन प्रसंगी भानुप्रताप बर्गे बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, मुख्य विश्वस्त तथा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त जानमहम्मद पठाण प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र मेडिकल स्टोअरचे उद्घाटन मा. सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक रोहिदास किरवे, भानुदास मानकर, सुनील जगदाळे, अपर्णा मारणे – साठ्ये, रवींद्र चव्हाण, मदन प्रधान, गणेश चव्हाण, अशोक माझीरे, व्यापारी संघटनेचे सचिन निवंगुणे, प्रसिद्ध उद्योजक हर्षद लोढा, अजित चंगेडिया, इक्बाल शेख, राजाभाऊ कदम, उपाध्यक्ष आशिष गांधी, मुकुंद म्हसवडे यांच्यासह सर्व संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.
भानुप्रताप बर्गे पुढे बोलताना म्हणाले की, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केलेला हा क्रांतिकारी उपक्रम आहे. या ठिकाणी कोणतेही औषध व इंजेक्शन तब्बल सत्तर टक्के मोफत देण्याचा संस्थेच्या माध्यमातून आम्हा सर्वांचाच प्रयत्न आहे. ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन आणि महाराष्ट्र मेडिकल या संस्थेचा प्रमुख सल्लागार पदाधिकारी असल्याचा मला अभिमान देखील आहे.
उमेश चव्हाण म्हणाले कि, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये सर्व महाराष्ट्रातून लोक उपचार घेण्यासाठी येतात. हजारो लोकांना महागडी औषधे व इंजेक्शने खरेदी करता येत नाहीत म्हणून त्यांना उपचार अर्धवटच थांबवावे लागतात. एक लाखाची दहा इंजेक्शन घेताना श्रीमंत माणूस देखील गलितगात्र होतो. लाखो रुग्णांना दर महिन्याला लागणारी औषधे इंजेक्शन खरेदी करताना कर्जबाजारी व्हावे लागत आहे, ही बाब लक्षात घेऊन ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन संस्थेने सुरू केलेले महाराष्ट्र मेडिकल महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलासा देईल.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयाकडून नववर्षाच्या स्वागतासाठी घाणीच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी


मिलिंद गायकवाड म्हणाले कि, पोलीस सेवेतील निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांसोबत सामाजिक काम करण्याचे ठरविले होते. मात्र आताचे सर्व राजकीय पक्ष आणि संघटना जातीपातीचे आणि धार्मिक तेढ वाढविणारे राजकारण करीत असताना सर्व जाती-धर्माच्या माणसांना लागणाऱ्या औषधाच्या उपचाराच्या वैद्यकीय चळवळीत काम करीत असल्याचे आता समाधान आहे. यापुढे महाराष्ट्र मेडिकल सोबतच आता डायग्नोस्टिक सेंटर, ॲम्बुलन्स सेवा, पॅथॉलॉजी लॅब सेवा सुद्धा पुढील काळात स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी स्वागत सचिन निवंगुणे यांनी केले तर आभार जानमहम्मद पठाण यांनी मानले. पहिल्याच दिवशी अनेकांनी महाराष्ट्र मेडिकल मध्ये 70 टक्के मोफत औषध खरेदीची सेवा मिळवली. महाराष्ट्र मेडिकल स्टोअर या उपक्रमाचे महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत आहे.