गंज पेठेतील एसआरए प्रकल्पावर आम आदमी पार्टीचे प्रश्नचिन्ह

पुणे : गंज पेठेतील सावधान मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए पुनर्वसन प्रकल्पातील जागांच्या एकत्रीकरणावरून आम आदमी पार्टीने एसआरए प्रशासनाला जाब विचारला आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ६३३ आणि ५९३-क या जागांचे एकत्रीकरण करण्यात आले असताना ६३१ आणि ६३२ या जागा मंजूर नकाशातून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत विकसक बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निर्णयांमागील नेमकी प्रक्रिया काय होती, ६३१ आणि ६३२ या जागा नकाशाबाहेर ठेवण्याचे कारण काय, तसेच त्याबाबत स्वतंत्र प्रस्ताव किंवा कागदपत्रे उपलब्ध आहेत का, असे प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, या दोन्ही जागांवरील पात्र झोपडीधारकांचा सावधान गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या मूळ जागा पुनर्वसनाच्या बांधकाम क्षेत्राबाहेर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन नेमके कुठे आणि कोणत्या आराखड्यानुसार होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासन आणि विकसक यांच्यात संगनमत झाले आहे का, याबाबत संशय व्यक्त करत सर्व संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे सहसंयोजक निरंजन अडागळे यांनी केली आहे. तसेच एसआरए प्रशासनाने या प्रश्नांवर स्पष्ट खुलासा करून रहिवाशांना न्याय द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

See also  रस्ता झाला निकृष्ट, पॅचवर्कच्या सूचनाकंत्राटदारावर अधिकाऱ्यांची मेहेरबाणी