पुणे : रिपब्लिकन पक्ष हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष असून, श्रमिक, कष्टकरी आणि समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. बाबासाहेबांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाशी एकनिष्ठ राहावे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पुणे शहराच्या वतीने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी १५ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वडगाव शेरी परिसरातील ब्रह्मा सनसिटी रोडवरील समर्थ बँक्वेट हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वाडेकर बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, वडगाव शेरी मतदारसंघ अध्यक्ष विनोद टोपे, ख्रिश्चन आघाडीचे शहराध्यक्ष क्रिस्टोपर राजमनी, नगरसेवक निलेश आल्हाट,नगरसेविका हिमाली कांबळे, बाबुराव घाडगे, शहर उपाध्यक्ष सुनील गवळी, अर्जुन आल्हाट, निलेश रोकडे, फिरोज खान, शमशुद्दीन शेख, चांदणी गायकवाड, मीनाज मेमन, हर्षदा गायकवाड, रेणुका चलवादी, भारत पवार, भीमा राठोड, भीमराव वानखेडे, पोपट कांबळे, संग्राम रोहम, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, सुधीर जगताप, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, जितेंद्र कांबळे, सुयश वाघमारे, किरण अवसरमल, चंद्रकांत जगधने, फिरोज शेख, आबा गायकवाड, नवनाथ रिठे, शशिकला थोरात, किरण सूर्यवंशी, स्टेनली नाथन आदि उपस्थित होते.
वाडेकर म्हणाले, मतांची चोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी काँग्रेसमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्याला काँग्रेस जबाबदार होती, याचे उत्तर आधी द्यावे. दिवसातून तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी जाऊ नये. आजच्या राजकारणात निष्ठा हीच नेत्यांची खरी ओळख आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिक पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व देतील.
संजय सोनवणे म्हणाले, शाखा निर्मितीच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. पक्षवाढीच्या दिशेने शाखा निर्मिती हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे.
बाळासाहेब जानराव म्हणाले, पुणे शहरात रिपब्लिकन पक्षाचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. मित्रपक्ष सध्या रिपब्लिकन पक्षाला नगरसेवक निवडणुकीत केवळ पाच ते सहा जागा देतात. मात्र, पक्षाची ताकद एवढी वाढवली पाहिजे की मित्रपक्षांनी स्वतःहून किमान ४० जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात.
















