पुणे : बालेवाडी आणि बाणेर परिसरातील प्रमुख चौकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशिक्षित वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा शास्त्रीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी उपपोलीस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्याकडे केली आहे.
बालेवाडी-बाणेर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती, व्यावसायिक आस्थापना, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि निवासी सोसायट्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील वाहनांची संख्या आणि वाहतुकीची घनता मोठ्या प्रमाणात वाढली असून, विशेषतः पीक अवर्समध्ये नागरिकांना अनेक प्रमुख चौक पार करण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याचे जगदाळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात असून, शाळकरी मुले, विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
साई चौक, दसरा चौक, क्रोमा सिग्नल चौक, ज्युपिटर हॉस्पिटल चौक, ज्युपिटर हॉस्पिटल परिसरातील जोडरस्ते, MITCON School चौक तसेच बाणेर हाय स्ट्रीट चौक, पॅनकार्ड रोड परिसर येथे वाहतूक कोंडीची समस्या अधिक जाणवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलीस कर्मचारी तैनात करण्याऐवजी संबंधित चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीचा शास्त्रीय अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. या अभ्यासामध्ये वाहनांची संख्या, पीक अवर्समधील वाहतूक प्रवाह, विविध दिशांनी ये-जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण, पादचाऱ्यांची वर्दळ, रस्त्यांची रुंदी, अनधिकृत पार्किंग, लेन व्यवस्थापन तसेच शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच आवश्यकतेनुसार वन-वे वाहतूक, लेन व्यवस्थापन, नो-पार्किंगची प्रभावी अंमलबजावणी, पादचारी क्रॉसिंग आणि सिग्नल यंत्रणा याबाबत निर्णय घेण्यात यावा. पीक अवर्समध्ये आवश्यक त्या ठिकाणी प्रशिक्षित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व चौकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी वाहतूक नियमन व्यवस्था लागू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी सुदर्शन जगदाळे यांनी केली आहे.
















