पुणे, दि. ४ सप्टेंबर : पाषाणगावातील पाषाण रोडवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकडून पुण्याच्या दिशेने जाताना डाव्या बाजूस असलेल्या मुख्य बसथांब्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, बसथांबा जीर्ण झाल्याने तो नागरिकांच्या अंगावर कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बसथांब्याचे तातडीने नूतनीकरण करावे अथवा नवीन बसथांबा उभारावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, सदर बसथांबा अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून देखभालीअभावी त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. बसथांब्यात प्रवाशांसाठी असलेला लोखंडी बाकदेखील जीर्ण झाला असून, अनेक ठिकाणी त्याच्या लोखंडी पट्ट्या निघाल्या आहेत. गंजलेल्या लोखंडामुळे प्रवाशांना बसण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होत नाही.
या बसथांब्याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थी, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांना भर उन्हात तसेच पावसात उभे राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या समस्येबाबत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांकडून वारंवार तक्रारी येत असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून बसथांब्याचे नूतनीकरण करावे किंवा नवीन बसथांबा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
येत्या आठ दिवसांत बसथांब्याचे नूतनीकरण अथवा नवीन बसथांबा उभारण्याचे काम सुरू झाले नाही, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच भविष्यात या जीर्ण बसथांब्यामुळे कोणताही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, अशोक मराठे, संदीप काळे, पांडुरंग सुतार, विजय ढाकणे, नंदन काळे, शिवम दळवी, किरण काकडे, महादेव मोरे आणि किशोर इंगवले उपस्थित होते.
















