बाणेरमधील ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क आदेश! रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेसच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई; कोट्यवधींच्या एफएसआय वापराची चौकशी करण्याची मागणी

पुणे : बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ५४ मधील रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेसच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेने कारवाई करत विकासक संजय बूब यांच्या मालकीच्या जागेवर विकसित होत असलेल्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ या बांधकाम प्रकल्पाला स्टॉपवर्क (काम थांबवा) आदेश दिला आहे.रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेस, मंजूर लेआउटमधील रस्ते आणि विकास हक्कांच्या वापराबाबत मुकुंदा तुकाराम तापकीर यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. अॅमेनिटी स्पेसपर्यंत मुख्य रस्त्यापासून लेआउटमध्ये आवश्यक असलेला नऊ मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.

रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेस, मंजूर लेआउटमधील रस्ते आणि विकास हक्कांच्या वापराबाबत मुकुंदा तुकाराम तापकीर यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. अॅमेनिटी स्पेसपर्यंत मुख्य रस्त्यापासून लेआउटमध्ये आवश्यक असलेला नऊ मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.

महापालिकेच्या कागदपत्रांनुसार, सर्व्हे क्रमांक ५४/१, ५४/२ आणि ५४/६ या मिळकतींच्या लेआउटला ४ मे २००९ रोजी मंजुरी देण्यात आली होती. तसेच संबंधित अॅमेनिटी स्पेस २०१० मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्याची नोंद आहे. असे असताना या जागेची उपलब्धता आणि त्याच्याशी संबंधित एफएसआयचा वापर याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महापालिकेच्या ताब्यातील अॅमेनिटी स्पेसशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या एफएसआयचा वापर नेमका कसा झाला, त्याचा लाभ कोणाला झाला आणि या व्यवहारामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

केवळ रेजेन्सी अस्ट्रा प्रकल्पाला स्टॉपवर्क आदेश देऊन हे प्रकरण संपणार नाही. रोहन लेहेर लेआउटच्या मूळ मंजुरीपासून अॅमेनिटी स्पेसच्या हस्तांतरणापर्यंत आणि त्यानंतर झालेल्या एफएसआय वापरापर्यंत संपूर्ण व्यवहाराची तपासणी होणे आवश्यक आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असल्यास त्याचे मूल्यांकन करून संबंधितांकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

रेजेन्सी अस्ट्रा प्रकल्पाचे काम थांबविण्याच्या कारवाईनंतर आता महापालिका अॅमेनिटी स्पेसच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करणार का, एफएसआय वापराचे लेखापरीक्षण होणार का आणि महापालिकेचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्याची वसुली केली जाणार का, हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात महापालिका पुढे काय भूमिका घेते, याकडे बाणेरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

See also  धनकवडी येथे मराठा संवाद बैठक संपन्न :मा.रणजित बहिरट पाटील यांची मराठा व्यवसाय आघाडी पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती