पुणे : दिवाळीच्या आनंदासाठी वर्षभर जपून ठेवलेली बचत स्वतःच्या आनंदासाठी खर्च न करता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अर्पण करत चिमुकल्या श्रेया काची हिने सामाजिक संवेदनशीलतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. तिच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री तथा पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्रेया काची हिने आपल्या दिवाळीच्या बचतीतून जमा केलेली रक्कम दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या छोट्या-छोट्या इच्छा बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची तिची भावना विशेष कौतुकास्पद ठरली.
नगरसेविका सौ. सपना आनंद छाजेड यांनी श्रेयाच्या या सेवाभावी उपक्रमाची दखल घेत तिला सोबत घेऊन खासदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घडवून आणली. यावेळी श्रेयाने आपल्या बचतीची रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केली. मोहोळ यांनीही तिच्या निरागस भावनेचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
लहान वयातच समाजातील गरजूंचे दुःख ओळखून त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या श्रेयाच्या कृतीतून सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा संदेश मिळत आहे. तिचा हा उपक्रम केवळ कौतुकाचा विषय नसून इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा ठरत आहे.वय लहान, पण विचार मोठे! दिवाळीच्या बचतीतून श्रेयाने जपला माणुसकीचा खरा प्रकाश.
















