बाणेर : कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत प्रलंबित असलेल्या मिसिंग लिंक संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम (आयएएस) यांच्यासमवेत सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि त्यावर उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
सोमेश्वरवाडी–सुतारवाडी, पाषाण तसेच बाणेर–बालेवाडी परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता, संबंधित मिसिंग लिंकची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने पूर्ण करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणे तसेच विकास आराखड्यात (डीपी) आवश्यक असलेल्या जागांचे जमीन अधिग्रहण लवकरात लवकर पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
राज्य सरकारच्या माध्यमातून या कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने, सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणारे रस्ते विकास प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
या आढावा बैठकीस प्रभाग क्रमांक ९ मधील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. कोथरूड परिसरातील वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
























