गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता; तरीही पुणे अस्वच्छ आणि प्रदूषित! स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीवर प्रशांत जगताप यांचा स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांना जाब

पुणे : केंद्रापासून राज्यापर्यंत आणि महापालिकेतही भाजपाची सत्ता असताना पुणे शहराच्या स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याची टीका काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या निकालात पुणे शहराची क्रमवारी घसरल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपाला जाब विचारला.

गेल्या वर्षी देशात आठव्या क्रमांकावर असलेले पुणे शहर यंदा बाराव्या क्रमांकावर घसरले आहे. शहरात ३५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, तसेच महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे ३५०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत असतानाही स्वच्छतेच्या बाबतीत अपेक्षित सुधारणा का झाली नाही, असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. एवढा खर्च करूनही शहराच्या स्वच्छता क्रमवारीत झालेली घसरण ही सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.

याशिवाय पुण्यातील वाढत्या वायुप्रदूषणाचा मुद्दाही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत नागरिकांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

एकीकडे स्वच्छ आणि सुंदर पुण्याचे आश्वासन दिले जात असताना दुसरीकडे स्वच्छतेच्या क्रमवारीत घसरण आणि वाढते प्रदूषण या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

See also  "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा ( पीस मार्च ) आयोजन "