अमित शाह यांची मोहोळ कुटुंबीयांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट; पारंपरिक पद्धतीने स्वागत

कोथरूड : देशाचे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी कोथरूड येथील केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने औक्षण करून अमित शाह यांचे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले.

या भेटीदरम्यान अमित शाह यांनी मोहोळ कुटुंबीयांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची आणि कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाने निवासस्थानी येऊन कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मोहोळ कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून एक विशाल परिवार आहे, याची प्रचिती या भेटीतून आली. सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेल्या राजकीय प्रवासात पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाकडून मिळणारे प्रेम, जिव्हाळा आणि मार्गदर्शन ही अभिमानाची बाब असल्याची भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

राजकीय आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांशी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी जपले जाणारे स्नेहाचे संबंध ही भाजपच्या परिवारभावनेची खासियत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अमित शाह यांच्या या स्नेहपूर्ण भेटीमुळे मोहोळ कुटुंबीयांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

See also  औंध येथे फुलोरा फाउंडेशन तर्फे शालेय साहित्याचे वाटप