पुणे: पुणे शहरातील पर्यावरणाचा कणा असलेल्या टेकड्यांवर होणाऱ्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात ‘आम आदमी पार्टी’ आक्रमक झाली आहे. पुणे पेठ कोथरूड येथील सर्व्हे नं. 113 मधील बिडीपी व हिलटॉप परिसरात कोणत्याही परवानगीशिवाय टेकडी फोडून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर -हास करणाऱ्या ‘मे. हिलतेज रियालिटी ॲन्ड डेव्हलपर्स एल. एल. पी.’ या बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणी आम आदमी पार्टीच्यावतीने आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगाधाम परिसरातील टेकडी फोड प्रकरणाप्रमाणेच कोथरूडमधील सुतारदरा भागातही अनधिकृत खोदकाम करून परिसराचे अतोनात नुकसान केले जात आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेने या विकासकाला काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. तसेच जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेले खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, केवळ काम थांबवून चालणार नाही, तर पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि टेकड्यांचे नुकसान करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रमुख मागण्या:
1) सुतारदरा कोथरूड येथील अनधिकृत गौण खनिजाची तात्काळ ईटीएस (ETS) मोजणी करण्यात यावी.
2) पर्यावरण नष्ट करणाऱ्या ‘मे. हिलतेज रियालिटी ॲन्ड डेव्हलपर्स एल. एल. पी.’ या बांधकाम व्यावसायिकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.
3) या देशोधडीच्या प्रकाराला आणि अनधिकृत कामाला पाठीशी घालणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
4) त्या ठिकाणी आतापर्यंत किती झाडे तोडली गेली, याचा सविस्तर अहवाल तयार करून, त्या झाडांच्या एकूण वयाएवढी नवीन झाडे त्याच विकासकाकडून लावून घेण्यात यावीत.
पुण्याच्या टेकड्या म्हणजे शहराचे नैसर्गिक आणि महत्त्वाचे पर्यावरण आहे. पर्यावरणाचा घात करणाऱ्या कोणालाही थारा दिला जाणार नाही. या प्रकरणात आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून विकासकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जमिनीचा अधिकृत सर्वेक्षण अहवाल, खोदकामाची ईटीएस ETS मोजणी, परवानगीची स्थिती, आणि पर्यावरण नुकसानाचे मूल्यांकन याची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी केली आहे
















