इको क्लब अंतर्गत शालेय परसबाग (किचन गार्डन) उपक्रम ; मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात पर्यायी लागवड व  भाजीपाल्याची लागवड

धानोरी : विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि स्वावलंबनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरव नगर, धानोरी, पुणे-१५ येथे इको क्लब अंतर्गत शालेय परसबाग (किचन गार्डन) उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत कमी जागेतही भाजीपाला व विविध वनस्पतींची लागवड करता येते, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आले. जागेचा अभाव असलेल्या ठिकाणी जुन्या बादल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, कुंड्या यांसारख्या उपलब्ध वस्तूंचा पुनर्वापर करून त्यामध्ये छोट्या रोपांची तसेच वेलींची लागवड करण्याची पर्यायी पद्धत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. या माध्यमातून पुनर्वापराचे महत्त्व आणि उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने उपयोग करण्याची शिकवण देण्यात आली.

शाळेच्या मोकळ्या जागेत पालक, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, भेंडी, मिरची यांसारख्या पौष्टिक भाजीपाल्याची तसेच तुळस, गवती चहा, कोरफड यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शालेय परसबागेत पिकविलेल्या भाजीपाल्याचा उपयोग शालेय पोषण आहार अर्थात माध्यान्ह भोजनामध्ये करता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताज्या, पौष्टिक भाज्यांचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे.

शालेय बाग व परसबाग उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाशी जवळीक निर्माण करणे, झाडांची निगा राखण्याची सवय लावणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे आणि स्वावलंबनाचे संस्कार घडविणे हा आहे. प्रत्यक्ष लागवड, पाणी देणे, रोपांची निगा राखणे आणि त्यांच्या वाढीचे निरीक्षण करणे अशा कृतींमधून विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभवात्मक शिक्षण मिळणार आहे.

या उपक्रमावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व इको क्लब अध्यक्ष श्री. विजय श्रीवास्तव तसेच इको क्लब समन्वयक सौ. सविता इमडे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना परसबाग उपक्रमाचे महत्त्व व लागवडीच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या.

या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष अनुराग पाटील, संस्थापिका व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन अर्चना बनछोड, प्रास्ताविक मानसी पलांडे, प्रात्यक्षिक तृप्ती कांबळे, जागेची निवड योगेश बिंदगे, निगा व देखभाल सुखदा वाळंज, कुंड्या तयार करणे स्नेहल भोसले व छायाचित्रण मुकेश विधाते यांनी ही महत्वाची भूमिका पार पाडली. यावेळी मारुती पाटील, मनीषा चिंचणे, अंबादास कांबळे, रूपाली पवार, प्रिया शेलार, ममता चौधरी, सुप्रिया भारती, रमाताई डंबारे, गौतम बोरकडे, अनामिका कुलकर्णी व शुभांगी काळगुडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

See also  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पेरणे फाटा येथे बसने प्रवास

“लावा रोपे, वाढवा निसर्गप्रेम; परसबागेतून घडवा निरोगी जीवन!” या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.