जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पेरणे फाटा येथे बसने प्रवास

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यासमवेत शिक्रापूर वाहनतळ ते पेरणेफाटा असा बसने प्रवास करून विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांशी संवाद साधला.

अनुयायांसाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सुविधेबाबत त्यांनी अनुयायांशी चर्चा केली. औरंगाबाद येथून आलेल्या अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना करण्यात आलेल्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. विशेषतः वाहनतळावरून शिस्तबद्धरीतीने आणि दर मिनिटाला बसची सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांतर्फे विजयस्तंभ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया, उपायुक्त आर. राजा, शशिकांत बोराटे, रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त विवेक पवार हे स्वतः संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेऊन होते. पोलिसांकडून गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस दलाने सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. ध्वनीक्षेपकाद्वारे अनुयायांना वाहनतळ, बस व्यवस्था, हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तींची माहिती आदीबाबत सूचनाही देण्यात येत होत्या.

नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी डॉ.देशमुख, पोलीस अधीक्षक श्री. गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेऊन होते आणि तेथूनच आवश्यक सूचनाही देण्यात येत होत्या. संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केल्याने आलेल्या अनुयायांनी समाधान व्यक्त केले.

See also  अदानी एअरपोर्ट देशातील इतर आणखी एअरपोर्ट मिळवण्यासाठी लावणार बोली.