साई चौकातील कचऱ्याची समस्या मार्गी; परिसर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात

बालेवाडी : बालेवाडी येथील साई चौकात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच कचऱ्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. याबाबत बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाच्या सभासदांसह स्थानिक नागरिकांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आणि स्वच्छ संस्थेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार साई चौकात कचरा उचलण्याचे काम सुरू झाल्यानंतर नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाच्या सभासदांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी केवळ कचरा उचलण्यापुरती कारवाई न करता संपूर्ण परिसर स्वच्छ करावा आणि भविष्यात नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक उकिरडे, सुरेंद्र जावळे तसेच स्वच्छ संस्थेच्या संध्या ढमाले व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलासमोरील महामार्गालगत असलेले कचरा वर्गीकरण शेड हटवून परिसर स्वच्छ केल्याबद्दल बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाच्या वतीने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.

See also  राज्यसभेमध्ये बजेट वरील भाषणात खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोदी सरकारचे कौतुक करत विरोधकांना सुनावले