पुणे : भारतीय कामगार चळवळ प्रदीर्घ संघर्षातून उभी राहिली आहे. कामगारांना मिळत असलेले वेतन, सामाजिक सुरक्षा, सेवा संरक्षण, संघटन स्वातंत्र्य आणि औद्योगिक न्यायाचे अधिकार हे अनेक दशकांच्या संघर्षातून आणि असंख्य कामगारांच्या बलिदानातून प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रत्येक कामगार संघटनेची ऐतिहासिक जबाबदारी आहे. सध्या केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता ह्या कामगारांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आहेत. या प्रदीर्घ संघर्षातून प्राप्त झालेल्या हक्कांवर, संघटन स्वातंत्र्यावर, रोजगार सुरक्षेवर, वेतन संरक्षणावर आणि सामाजिक सुरक्षेवर यामुळे प्रतिकूल परिणाम होणार आहे. कामगारांचे मूलभूत अधिकार आणि त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी या नवीन चारही कामगार संहिता रद्द करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यापक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी केले.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक), महाराष्ट्र शाखेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी, रविवारी (दि. २१, २२ नोव्हेंबर २०२६) पुणे येथे दोन दिवसीय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व माजी आमदार मोहन जोशी, इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग, महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, काँग्रेस नेते गोपाल तिवारी, राष्ट्रीय सचिव मुकेश तिगोटे, महाराष्ट्र इंटकचे दिवाकर दळवी, नंदू खानविलकर, महेश करकरा, प्रवीण वाजपेयी, श्रद्धा कोद्रे, तुकाराम देकाते, जी. एस. गावडे, दत्तात्रय गुट्टे, सुनील देसाई, शशिकांत धुमाळ, राजेंद्र खराडे, मनोहर गडेकर, चेतन आगरवाल, विजय जाधव, शीतल कोतवाल, ॲड. फयाज शेख, कुमार मारणे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, मंगेश पवार व इंटकचे पदाधिकारी, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि राज्यभरातून आलेले कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित चळवळ आवश्यक आहे. संघर्ष केवळ एका संघटनेपुरता मर्यादित न ठेवता देशातील सर्व कामगार संघटना, कामगार नेते आणि कामगारांनी एकजुटीने पुढे नेला पाहिजे. बदलत्या औद्योगिक परिस्थितीत कामगारांच्या प्रश्नांचे स्वरूप बदलत असले, तरी कामगारांच्या मूलभूत हक्कांशी कोणतीही तडजोड स्वीकारता कामा नये. कामगार चळवळीमध्ये एकजूट, शिस्त आणि संघटनात्मक बांधिलकी अत्यंत महत्त्वाची असून, देशभरातील कामगार संघटनांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र यावे. महाराष्ट्रातील इंटक संघटनेनेही कामगारांच्या प्रश्नांवर अधिक व्यापक, आक्रमक आणि प्रभावी पद्धतीने काम करून या चार कामगार संहिता रद्द करण्यासाठी व्यापक आंदोलन उभारले पाहिजे अशी अपेक्षा इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी व्यक्त केली.
या दोन दिवसीय अधिवेशनात कामगार हिताच्या दृष्टीने १४ ठराव मंजूर करण्यात आले.स्वागत महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि आभार सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी मानले.















