संविधानिक मूल्यांच्या जागृतीतून संविधान दिन साजरा; मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

धानोरी : भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय श्रीवास्तव होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत मूल्यांचा अंगीकार करण्याची शपथ घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानाची माहिती देऊन संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

संविधान दिनानिमित्त चित्रकला, घोषवाक्य लेखन, प्रश्नमंजुषा, गीत गायन, पोवाडा, भाषण व नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांना व विचारांना अभिव्यक्ती दिली. विविध सादरीकरणांतून देशप्रेम, सामाजिक समता, लोकशाही, एकता, बंधुभाव आणि संविधानिक मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.

भाषण स्पर्धेत प्रथम तेजश्री मॅकल (इयत्ता सातवी), द्वितीय हर्षिता जैन (इयत्ता सहावी), तृतीय साक्षी जैन (इयत्ता पाचवी) यांनी क्रमांक मिळवले, तर तनिष्का मॅकल व सार्थक खंडागळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.पोवाडा स्पर्धेत श्रावणी कंगणकोटे, रिया भालेराव, धनश्री उदांगे, संजना शिंदे व सलोनी माने या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. गीत गायन स्पर्धेत शरयू आढाव, संध्या खटके, आराध्या वायाळ, स्मिता बनसोडे, श्रावणी वाघमारे व जानवी मुंडे यांनी सहभाग नोंदविला.

नृत्य स्पर्धेत जानवी मुंडे, आस्था वर्मा, तेजश्री मॅकल, अनया शिंदे, अनन्या सकट, श्रुती भोसले, रेणुका होसमनी, समृद्धी बनसोडे, साक्षी मस्के, स्नेहल वायदंडे व क्षितिजा जाधव यांनी सहभाग घेऊन नृत्यकौशल्याचे सुंदर प्रदर्शन केले. घोषवाक्य लेखन उपक्रमात योजन ढालमारे, साई कांबळे, उजेब पठाण, आयुष शिंदे, परी मारकुळे, निधी तायडे, स्वप्नाली खंडागळे व रितिका घुमरे यांनी संविधानिक मूल्यांवर आधारित घोषवाक्ये तयार करून सामाजिक जागृतीचा संदेश दिला.

See also  पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृप्ती कांबळे यांनी केले. त्यांनी संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात रुजविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

मुख्याध्यापक विजय श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क, नागरिकांची कर्तव्ये, लोकशाहीची तत्त्वे व सामाजिक मूल्ये याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपल्या हक्कांची जाणीव ठेवतानाच कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करावे, समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करावा आणि समता व बंधुतेची भावना जोपासावी, असे आवाहन केले.मुख्याध्यापिका विद्या पाटील यांनी संविधानाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शिस्त, समानता, सहिष्णुता, परस्पर आदर व सामाजिक बांधिलकी ही मूल्ये अंगीकारावीत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या नियोजनात व आयोजनात अर्चना बनछोड, सविता इमडे, योगेश बिंदगे, सुखदा वाळंज, शारदा पाटोळे, स्नेहल भोसले, मानसी पलांडे यांनी सहकार्य केले. यावेळी मारुती पाटील, मनीषा चिंचणे, अंबादास कांबळे, रूपाली पवार, प्रिया शेलार, ममता चौधरी, सुप्रिया भारती, रमाताई डंबारे, गौतम बोरकडे, मुकेश विधाते, अनामिका कुलकर्णी व शुभांगी काळगुडे उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

संविधान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाहीची जाणीव, राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना वृद्धिंगत झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.