राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एस. चोकलिंगम यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सुनील माने यांनी केली आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमाह पैसे दिले जात आहेत. या योजनेचे फॉर्म भरून घेताना सरकारने या लाभार्थ्यांचा डेटा घेतला आहे. या डेटाचा वापर करून अजित पवार यांच्यावतीने महिलांच्या मोबाईलवर पत्र पाठवण्यात येत आहे. यात महिलांना सरकारने पैसे दिल्याचा उल्लेख करत मत देण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीला भाऊबीज म्हणून पुन्हा पैसे देणार असल्याचाही उल्लेख यात केला आहे. त्याचप्रमाणे सत्ता गेल्यास विरोधक ही योजना बंद करतील अशी भिती या पत्राद्वारे दाखवून विरोधकांना मत देऊ नका असे सांगितले आहे.

या पत्रामुळे मतदारांवर प्रभाव पडत असून हे पत्र पाठवल्या बद्दल अजित पवार व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांवर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच लाडकी बहीण योजनेचा डेटा वापरण्यास सत्ताधाऱ्यांना मनाई करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

See also  मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार