पुणे : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) धडक कारवाई केली. या मोहिमेत तब्बल ४३ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच ६४ शेड आणि २७ अनधिकृत स्टॉल हटविण्यात आले.
पाषाण गाव ते सूस रस्ता आणि पाषाण लिंक रोड परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. रस्ते व पदपथांवर अनधिकृत व्यावसायिक स्टॉल, काउंटर आणि विविध साहित्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक वाहतूक सुरळीत करणे, पदपथ मोकळे करणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
उप आयुक्त सोमनाथ बनकर (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग), उप आयुक्त अविनाश सपकाळ (परिमंडळ क्र. २) आणि सहायक आयुक्त इंद्रायणी करचे (औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान दुकानांबाहेरील अनधिकृत बोर्ड, बॅनर व जाहिरात साहित्यही हटविण्यात आले. बांधकाम विकास विभाग, झोन क्र. ३ यांच्यामार्फत फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत कच्च्या व पक्क्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेसाठी ४ कनिष्ठ अभियंते, ६ अतिक्रमण निरीक्षक, ४ मनपा पोलीस, १२ एमएसएफ जवान, २२ बिगारी सेवक, ३ जेसीबी, १ गॅस कटर आणि २ ओपन ट्रक तैनात करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील रस्ते व पदपथ मोकळे करण्यास मदत झाली आहे.
















