संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी नाटकातून संविधानिक मूल्यांचा संदेश दिला

हडपसर : स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल, ८३ बी इंग्रजी, डी.पी. रोड, माळवाडी, हडपसर येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना अस्मिता मॅडम यांनी केली. त्यानंतर सलमा मॅडम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची ओळख करून दिली. शाळेचे मुख्याध्यापक विनायक पुणेकर यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगताना भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा मजबूत आधार असून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य प्रदान करणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांनी संविधानाच्या महत्त्वावर आधारित विविध नाट्यप्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून संविधानातील मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, समानता, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. इयत्ता ७ वीच्या नाटकाचे लेखन कृष्णाली मॅडम यांनी केले, तर इयत्ता ५ वी व ६ वीच्या नाटकांचे लेखन वंदना मॅडम आणि अनुराधा मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर  गावडे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित poster making स्पर्धा आयोजित केली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत संविधानाविषयीचे ज्ञान आणि माहिती प्रदर्शित केली. तसेच अक्षयकुमार कांबळे  यांनी संविधान म्हणजे काय, संविधानाची निर्मिती, आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे स्थान आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात संविधानाचे असलेले महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि देशाच्या जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण झाली. नाटक, प्रश्नमंजुषा, उद्देशिका वाचन आणि मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे संविधान दिनाचा कार्यक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण ठरला.

“संविधानाचा आदर करूया, लोकशाही मूल्ये जपूया आणि जबाबदार नागरिक बनूया”हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

See also  पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ सेवा कार्यान्वित !