पुणे (औंध), दि. २६ (प्रतिनिधी : शशिकांत पाटोळे) : ७७ वा भारतीय संविधान दिन औंध येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा परिसर विद्युत रोषणाई आणि फुलांनी आकर्षक पद्धतीने सुशोभित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या नवनियुक्त सहायक आयुक्त सौ. इंद्रायणी करचे-गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
सहायक आयुक्त सौ. करचे-गायकवाड यांचा विशेष सत्कार*
औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या पहिल्या महिला सहायक आयुक्त म्हणून नियुक्त झाल्याबद्दल सौ. इंद्रायणी करचे-गायकवाड यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) पुणे शहर नेते रमेश ठोसर यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. त्यांना भारतीय संविधानाची प्रत, राजमुद्रा असलेला पेन, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी संविधानाच्या महत्त्वावर आपले मनोगत व्यक्त केले. “भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आणि लोकशाहीचा भक्कम पाया आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या या ग्रंथाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा अधिकार दिला आहे. हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून विविधतेत एकता टिकवणारा आणि सर्वांना समान न्याय देणारा जिवंत दस्तऐवज आहे,” अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिक व मुलांना लाडू वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास औंध पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक ढूस, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, ॲड. मधुकर मुसळे, सुनील उपाध्ये, महादेव नेटके, युवा नेते अजय निरवणे, चंद्रकांत आव्हाड, निलेश ठोसर, सागर ससाणे, संतोष कांबळे, स्वप्नील पालके, प्रवीण ठोसर, निवृत्ती लांडगे, विनोद निरवणे, प्रशांत ठोसर, शुभम कांबळे, दिलीप गायकवाड, युवराज उबाळे उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका निवेदिता वाघमारे, भारती कदम, महिला आघाडीच्या सुरेखा परिहार, छाया ठोसर, हिरा घोडेराव यांच्यासह औंध व बोपोडी परिसरातील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.















