आय. टी. आय. भोर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर


भोर : महाराष्ट्र शासनाच्या आयटीआय भोर तर्फे स्वयंवर मंगल कार्यालय, भोलावडे भोर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याशिबिराचे उद्घाटन पंचायत समिती भोरचे गटविकास अधिकारी मा. किरणकुमार धनवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर चे प्राचार्य एस. एन. पुरी, वेल्हा आयटीआयचे प्राचार्य ए.ए. साबळे, मुळशी आयटीआयचे प्राचार्य आर.एन‌. वागद्रे यांनी एकत्रित आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये श्री विलास शिवतारे डायरेक्टर सत्यजित इंजिनिअरिंग रामबाग भोर, डी. एस. जगताप प्राचार्य आयटीआय माणिकडोह, संजय कडू प्राचार्य, आर. आर. महाविद्यालय भोर आदी उपस्थित होते.

श्री. किरण कुमार धनवडे मा. गटविकास अधिकारी भोर यांनी समाजात वावरताना कौशल्य व शिक्षण यांचे महत्त्व सांगताना शून्यातून विश्व निर्माण करता येते असे सांगितले. तसेच स्टॉलची पाहणी करताना सर्व कौशल्याची माहिती घेतली व विद्यार्थी आणि शिल्पनिदेशक यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे प्राचार्य एस. एन. पुरी यांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा उद्देश, पार्श्वभूमी स्वरुप व या शिबिरामुळे विद्यार्थी व पालक यांना होणारा लाभ याविषयी मार्गदर्शन केले.
प्राध्यापक विजय नवले यांनी आयटीआय ते उद्योजक बनण्याचा प्रवास सांगितला. खास आपल्या शैलीत “जिंदगी की यही रीत हे हार के बाद ही जीत हे” या गाण्याचा आधार घेत जीवनात कितीही संकटे आले तरी कौशल्याच्या जोरावर आपण यशस्वी उद्योजक बनू शकतो आणि ही काळाची गरज असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच स्टॉल वर असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतींचे विशेष कौतुक केले. माननीय श्री. अमोल तळेकर कौशल्याचार्य सन्मान प्राप्त यांनी समाजात आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवावे याबद्दल मार्गदर्शन केले. माननीय श्रीमती सुवर्णा तोरणे यांनी शासनाच्या विविध योजना व महाकरियर पोर्टल बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. टाटा स्काय कंपनीचे सह व्यवस्थापक अमोल जाधव यांनी कलचाचणी, शिक्षण व उद्योग कौशल्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कॅप्टन आशा शिंदे यांनी डिफेन्स मध्ये जाण्याचा रोड मॅप व त्यातील स्वतः अनुभवलेले आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिरात भोर तालुक्यातील सर्व खाजगी आयटीआय सुद्धा सहभागी झाले होते.
या शिबिराचा लाभ ३१५ विद्यार्थी व पालक यांनी घेतला. यामध्ये २८० मुले, १४ मुली व २१ पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा पागे व आभार प्रदर्शन माननीय प्राचार्य श्री आर. एन. वागद्रे यांनी केले.

See also  गणेशखिंड मॉर्डन महाविद्यालयाने लष्करी रुग्णालयांसाठी केले रक्तदान