पुणे : अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांच्या ‘तणावमुक्ती’ करीता व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक श्री. गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती साठे, कारागृह अधीक्षक राणी भोसले, कारागृह उपअधीक्षक शिवशंकर पाटील, स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते अशोक देशमुख उपस्थित होते.
यावेळी अशोक देशमुख यांनी तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानात शारीरिक व मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी दररोज हलका व्यायाम व योगासन करण्याचे महत्व बंद्यांना पटवून देवून विविध शारीरिक वेदना व व्याधींवर हलक्या व्यायाम प्रकारांचे प्रशिक्षण दिले. दैनंदीन जीवनात आनंदी राहणे व हसणे याचे अनन्य साधारण महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन सत्रात संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेत जवळपास ३०० बंद्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या समारोपात काही बंद्यांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.