बाणेर : खाजगी जागेतील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिका कारवाई करत आहे परंतु पुणे महानगरपालिकेच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे व अनधिकृत केबल पालिका कधी काढणार असा प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सतीश रणवरे यांनी केली आहे.
बाणेर रस्त्यावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने दुकानांपुढील अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली. पुणे महानगरपालिका काही ठराविकच भागामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहे. बाणेर बालेवाडी परिसरातील राजकीय वरदहस्त असलेल्या पत्र्याच्या शेड्सवर तसेच अनधिकृत बांधकामांवर एकदाही कारवाई झालेली नाही. पुणे महानगरपालिकेच्या ही बाब निदर्शनास आणून देखील अधिकारी योग्य कारवाई करत नाहीत.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई होत असताना पालिकेच्या स्वतःच्या जागेतील अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई का करत नाही? तसेच पुणे महानगरपालिकेच्या विद्युत खांबांवर हजारो किलोमीटर लांबीच्या अनधिकृत इंटरनेट केबल टाकण्यात आलेल्या स्पष्ट दिसत असताना. या केबल धारकांविरुद्ध पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल का केले जात नाहीत असा प्रश्न नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
पुणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत समाविष्ट केलेल्या स्मार्ट एरियामध्ये दररोज अनधिकृत केबलवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभारावी. तसेच या परिसरातील अनधिकृत केबलवर कारवाईचे धोरण निश्चित करण्यात यावे अशी मागणी बाणेर परिसरातील विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी केली आहे.