सहाय्यक आयुक्तांनी खड्ड्याची दखल घेतल्यानंतर आठ दिवसांनी सुरक्षेसाठी नागरिकांना उभा करावा लागला टायर

पाषाण : पाषाण येथील साई चौकामध्ये सिग्नल वर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांचे वारंवार अपघात होत असून हा खड्डा बुजवण्यात यावा म्हणून सहाय्यक आयुक्तांना आठ दिवसापूर्वी फोटो पाठवले. यानंतर याची नोंद घेतली आहे असे सहाय्यक आयुक्त यांनी तातडीने व्हाट्सअप द्वारे कळवले देखील.
परंतु आठ दिवस उलटून देखील उपाययोजना न झाल्याने अखेर नागरिकांनी या परिसरामध्ये खड्डा लक्षात यावा म्हणून टायर उभा करून ठेवला आहे. नागरिकांच्या तक्रारीचे दखल पुणे महानगरपालिका घेत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी वारंवार होत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या कट्ट्यांमध्ये वाहने जोराने आदळत असल्याने वाहनांचे देखील नुकसान होत आहे.

तर अनेकदा नागरिकांना मोठ्या रस्त्यांची दुरुस्ती मुख्य खात्यामार्फत होते तर अंतर्गत छोट्या रस्त्यांची दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते अशी उत्तरे मिळत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्या मुख्यपथ विभागाकडून समन्वय साधून तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  हडपसर येथील दूषित पाणी येत असलेल्या परिसराची शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांची पाहणी