महाळुंगे येथील VTP Aethereus सोसायटीत पाण्याचा तीव्र प्रश्न; रहिवाशांचा व्यवस्थापनाविरोधात मोर्चा

पुणे : महाळुंगे येथील VTP Aethereus सोसायटीमध्ये मागील काही महिन्यांपासून पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर समस्या निर्माण झाली असून संतप्त रहिवाशांनी आज बांधकाम व्यावसायिकाच्या मॅनेजमेंट टीमविरोधात सोसायटी परिसरात मोर्चा काढला.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीमध्ये येणारे पाणी गढूळ, हिरवट रंगाचे असून त्याला तीव्र घाणेरडा वास येत आहे. या दूषित पाण्यामुळे लहान मुलांना उलट्या, पोटदुखी तसेच इतर आरोग्यविषयक त्रास होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

“अनेक वेळा तक्रारी करूनही व्यवस्थापनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. तात्पुरते उपाय केले जातात, मात्र समस्या कायम आहे,” अशी नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा मूलभूत हक्क असून त्याबाबत निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

रहिवाशांनी पाण्याची तात्काळ तपासणी करून शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा करावा, संबंधित यंत्रणेची दुरुस्ती करावी तसेच जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या प्रकाराची दखल महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाने घेऊन पाण्याचे नमुने तपासावेत आणि नागरिकांच्या आरोग्याची तातडीने काळजी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

See also  पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक - पालकमंत्री चंद्रकांत पाटील