पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करणार असून यावेळी मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी साकारली आहे. पाहाताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली आहे.

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले असून यंदाची पगडीही चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे’.

मोहोळ पुढे म्हणाले, ‘मोदीजींचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले आहे. पण आजची पगडी निश्चितच विशेष आहे. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे’

छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळा देऊन होणार स्वागत !
पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी खास पगडी साकारल्यानंतर त्यांचे स्वागतही जोरदार केले जाणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आणि तलवार भेट देऊन मोदींचे स्वागत करणार असल्याचेही मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

See also  "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा ( पीस मार्च ) आयोजन "