पुणे : देशातील ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. महाराष्ट्राला फक्त खोके तसेच फोडा आणि राज्य करा, हेच दिले आहे. येथील शेतकरी, महिला, युवकांसाठी काहीच केले नाही. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविणारे व राज्यातील शेतकर्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास लावणाऱ्या मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही. अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर पुण्यात टीका केली. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल अशी टिपण्णी त्यांनी केली.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता नाना पटोले पुणे शहराच्या दौरावर आहेत. यावेळी कॉंग्रेस भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पटोले यांनी पुण्यातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, निवडणुक प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, सरचिटणीस अजित दरेकर, सरचिटणीस संजय बालगुडे, सरचिटणीस वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, नीता राजपूत, राज अंबिके, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले कि महाराष्ट्रातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील. कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच कॉंग्रेसची गॅरंटी कार्डला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. उमेदवार कोणीही असू जनता महाविकास आघाडीला मतदान करीत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात वेगळेच मुद्दे मांडत आहे. ही निवडणुक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे. परंतु ते हिंदु विरुद्ध मुस्लीम अशी करण्याचा प्रयत्न करु लागले आहे. चीन आपला भुभाग बळकावित आहे त्यावर ते काही बोलत नाही. कांदा निर्यातबंदीवर ते बोलत नाही, केवळ गुजरातमधून कांदा निर्यात केला जातो. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातात, त्यावर ते काही बोलत नाही. एक रुपयाची पीक विमा योजना फसवी ठरली, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळाली नाही असे अनेक मुद्दे आहेत त्यावर त्यांनी बोलले पाहीजे. केवळ नेहरू-गांधी परिवारावरच ते बोलत आहेत. सोलापुरला त्यांची सभा झाली पण तेथेही ते दुष्काळ, पाणीटंचाई या विषयावर काहीच बोलले नाही. त्यामुळे मोदी यांना मते मागण्याचा अधिकार नाही.
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळात देशाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी देशाला मजबूतपणे सांभाळले. मोदींनी सर्व बाजूंनी देशाचे नुकसान केले आहे. इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडी तर्फे कोठेही हिंदू-मुस्लीमचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळेच भाजपाला त्रास होत आहे. आपला देश जातीप्रधान देश आहे. प्रत्येक जातीला न्याय देणे सरकारची जवाबदारी असते. मात्र देशातील जनतेची दिशाभूल करून चुकीचे सांगितले जात आहे. जनतेला गेल्या १० वर्षांत मोदींनी काहीच केले आहे, हे कळून चुकले आहे. काँग्रेस देशातील जनतेसाठी, देशासाठी, महिलांसाठी व शेतकर्यांसाठी काय करणार, हे मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे भाजपा बॅकफूटला गेली आहे.
सर्वांत खोटारडे पंतप्रधान
पंतप्रधान पदाची एक गरिमा असते. त्यानुसार वागणे आवश्यक असते. मात्र गेल्या १० वर्षांत काहीच केले नसल्याने काम काय केले हे पंतप्रधानांना सांगता येत नाही. चीन प्रश्न, पेट्रोल दर, महागाई हे सर्वच गंभीर प्रश्न असल्याने यावर पंतप्रधान बोलतच नाही. एवढा खोटारडा पंतप्रधान देशाने पहिल्यांदा पाहिला आहे. जतनेलाही सर्व माहित असल्याने निकाल महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या बाजूनेच असणार आहे.