पुणे :पुणे परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने १९ मे रोजी रात्री अडीच वाजता मद्यधुंद अवस्थेत बेभानपणे कार चालवून दुचाकीवरील दोघांना चिरडले. त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलमध्ये यथेच्छ दारू ढोसून झाल्यावर बेफाम वेगात कार चालविणारा वेदांत अल्पवयीन असल्याचा साक्षात्कार तपास यंत्रणांना झाला. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी ३०६/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम 279,304(अ) ,337,338,427.मोटार वाहन अधिनियम कलम 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आणि त्याला आज १९ मे रोजी दुपारी जामीनही मंजूर झाला. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असे जाहीर केले होते. आपल्या त्या घोषणेला जागून आता पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
‘पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडले आहे. त्यात नाईट-लाईफ कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम्ही केली आहे’
– मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजपा
पुण्यातील नाईट लाईफ बाबत ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून केवळ पब संस्कृतीच नव्हे तर रस्त्यावर किंवा काही प्रमुख चौकांमध्ये देखील “रात्रीस खेळ चाले” अशी परिस्थिती आहे.नळस्टॉप चौकातील खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल व हातगाड्यांबद्दल तेथील नागरिक तक्रार करून दमलेत.नळस्टॉप चौकातील सर्वदर्शन सोसायटी ने तर सर्वत्र अर्ज केले, कोणतेही एन ओ सी दिले नसताना त्यांच्या येथे पहाटे पर्यंत तरुण तरुणींचा धिंगाणा आपण इंस्टाग्राम वर पण बघू शकतो.
त्यात भर की काय म्हणून पुढे एस एन डी टी कॉलेज समोर असलेल्या मेट्रो स्टेशन समोर आता एक खाऊ गल्ली सुरु होतं असून तेथे 24×7 चा फलक लागला आहे.
अश्या सर्व प्रकरणात आता पोलीस आणि मनपा ने संयुक्त कारवाई करणे गरजेचे असून हा केवळ पुण्याची संस्कृती रक्षणाचा विषय नसून भावी पिढीला विनाशापासून वाचविण्यासाठी आता कठोरतम कारवाई करावी अशी आग्रही मागणी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.