पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था पाहता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा; “आप”ची मागणी

पुणे : पुणे शहरतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थती दिवसेंदिवस बिघडत चाललेली असून, त्यावर कुठल्याही प्रकारे नियंत्रण मिळवण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी शहराच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर कुख्यात गुन्हेगारांची परेड काढून नागरिकांन मध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु काही दिवसातच हा प्रयत्न पुरेसा नसल्याचे दिसून येते.


पुणे शहराच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोथरूड परिसरातील अलंकार पोलीस चौकीच्या हद्दीत चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत १६ मे रोजी एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केली गेली होती. पुण्याचा भाग असलेल्या मोहम्मद वाडी परिसरात दिनांक १८ मे रोजी एका टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत सोनाराचे दुकान लुटले होते. २० मे २०२४ रोजी पहाटे २.३० च्या दरम्यान पुण्यातील बांधकाम व्यवसाईक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने गाडी चालवत अपघात घडवला आणि सदर अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) या दोन तरुण-तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. सदर अपघातावेळी गाडी चालवत असलेला वेदांत हा मद्याच्या अमलाखाली असल्याने सदर अपघात झाला असल्याचे अपघातावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. सदर अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पुण्यामध्ये मद्य विक्री करण्यासाठी हॉटेल इतकी उशिरा पर्यत कोणाच्या वरदहस्ताने सुरु असतात? अशा उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल व्यवसाईकावर पोलीस प्रशासन कारवाई का नाही करत? रात्री गस्त घालणारे पोलिसांचे भरारी पथक काय करते?  पोलिसांचे काही आर्थिक हितसंबंध ह्यात आहेत का? तसेच सदर अपघात झाल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील पोलीस चौकीत वेदांत अगरवाल ह्याच्यावरील कारवाई वेळी उपस्थित असल्याने उद्योजक व राजकारणी ह्यांचे हितसंबंध पुढे येत आहेत. वास्तविक पाहता पोलीस तपास तसेच गुन्हा नोंदविला जात असताना त्यांच्या उपस्थितीची गरज तिथे का लागली? याची माहिती पोलीस प्रशासनाने नागरिकांना द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

या उलट, दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी महापालिकेच्या कात्रज येथील (Lt.SR Kadam swimming pool Royal Aquatic Club Training Centre) या ठिकाणी साहिल महेंद्र उके या २१ वर्षीय तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी आज २० मे पर्यंत कोठलीही तक्रार नोंदविली नसल्याचे सदर मयत तरुणाच्या घरच्यांचे म्हणणे आहे. गुन्हा नोंदविण्याकरिता पोलीस प्रशासन टाळाटाळ करत असून त्याचा नाहक त्रास मृताच्या कुटुंबियांना होत आहे. पोलीस प्रशासनाकडून अगदी ६-६ तास तक्रार कर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये थांबून ठेवले जात असल्याचे मृताच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

मुंबईच्या गिरगावात मराठी माणसाला नोकरी नाकारण्याच्या घडलेल्या प्रकारची तक्रार श्री.आनंद वांजपे (दिनांक ०५/०५/२०२४) आणि ॲड.अमोल काळे (०६/०५/२०२४) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात करून देखील २० मे २०२४ पर्यंत पोलिसांच्या वतीने त्यांच्या तक्ररी बद्दल ची कोणतीही माहिती त्यांना देण्यात आलेली नाही असे तक्रारदरांचे म्हणणे आहे. तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजेच १२ मे रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप करत सहकारनगर पोलीस ठाण्यात ठीय्या आंदोलन केले होते. त्यांच्या या आरोपांची देखील पोलीस प्रशासनाने भाजपा च्या दबावामुळे उदासीन भूमिका घेत चौकशी करण्याचे टाळले असल्याचे सर्व पुणे शहराने पहिले आहे. 

या सर्व गोष्टी पाहता, पोलीस प्रशासन हे सर्व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकक्षेत सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकत नसल्याचे दिसून येते, या उलट व्यावसाईक तसेच श्रीमंतांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे होऊन पोलिसांकडून कामे करून घेताना दिसून येते. या सर्व प्रकारांवरून असे दिसून येते कि, ४०० पार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावताना त्यांच्या गृहमंत्री पदाच्या जवाबदारीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे व त्यांचा पोलीस प्रशासनावर कंट्रोल नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे देखील पुण्यात घडणाऱ्या घटनानकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जर हे दोघे हि जनतेला न्याय देऊ शकत नसतील तर त्यांनी तत्काळ आपल्या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत.

See also  शिवसेना शाखा सुतारवाडी व सन वाईन प्रीस्कूल च्यावतीने वृक्षरोप वाटप