साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाच्या सामाजिक,आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी पात्रता, निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी मातंग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

मातंग समाजातील व तत्सम बारा पोट जातीतील त्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला/टी-सी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट साईज फोटो दोन, उत्पन्नाचा दाखला (रु.३ लाख रूपयांच्या आत) इत्यादीसह अर्ज करावा.

प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या संस्थेसाठी :- सदर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची नोंदणी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. या प्रशिक्षणासाठी अदा करावयाची प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील. त्या शिवाय या संस्थेची प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही. या पात्र संस्थाचालकांनी नियम व अटीशर्तीनुसार प्रस्ताव https://www.slasdc.org या प्रणालीवर सादर करण्यात यावा. ही प्रशिक्षण संस्था मुंबई शहर व उपनगर  जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

३० जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय,मुंबई शहर उपनगर रूम नंबर ३३, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू.) मुंबई ४०००५१ येथे स्वीकारले जाणार आहेत. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळेल

See also  कोथरूड मध्ये मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन