सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

सातारा : सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला असून मोबाईल, टॅब, संगणक व इंटरनेट हे व्यक्तीचे दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. मोबाईलमधील वेगवेगळ्या अॅप्लीकेशच्या माध्यमातुन विविध अॅपसद्वारे सायबर गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हयांमध्ये फेसबुक, इंन्स्टाग्राम, टेलीग्राम, शेअरचॅट, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून व्यक्तींची बदनामी करणे, आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावरुन फिशींग, आयडेंटीटी श्रेष्ट, रैमसनवेअर अटॅक, हॅकिंग, सायबर स्कंमस, सायबर बुलींग, स्टाकिंग, सॉफ्टवेअर पायरसी, सोशस मिडीया फ्रॉडस, ऑनलाईन ड्रग्ज ट्राफिकिंग, इलेक्ट्रॉनिक मनी लॉन्डरींग, सायबर इक्स्टॉर्शन, ऑनलाईन रिक्रूटमेंट फ्रॉडस, इत्यादी प्रकारचे सायबर गुन्हे सध्या समाजामध्ये घडत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस विभागाकडील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. याबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या सायबर कॉमिक बुकचे अनावरण पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याहस्ते झाले.

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता करण्याकरीता ०१ जुलै २०२४ पासून सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद अंतर्गत व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरुकता वाढविण्याकरीता सायबर जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे.

यामध्ये सातारा जिल्हयातील सर्व शाळांमध्ये सायबर जागरुकता निर्माण करण्याकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडून सायबर जागरुकतेसंबंधी सर्व सामग्री पुरविण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमध्ये सदरसामग्रीचा वापर करुन १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये जिल्हयातील सर्व शाळांमध्ये सायबर जागरुकतेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल व या परिक्षेमधून ज्या विद्यार्थ्यांना (१ मुलगा १ मुलगी) चांगले गुण मिळतील त्यांना त्याच शाळेचे सायबर अॅम्बेसीडर म्हणून निवडण्यात येईल व त्यांचे मनोबल वाढविणेकरीता ऑगस्ट २०२४ चे पहिल्या आठवडयामध्ये त्यांचा सत्कार घेण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा उपयोग सायबर गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता होणार आहे.

See also  शास्त्रीनगर कोथरूडमध्ये  प्रभाग क्रमांक दहा ड्रेनेज लाईनची दुरवस्था, दुरुस्तीची काँग्रेसची मागणी