बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेली धमकी खपवून घेतले जाणार नाही -खा.सुप्रिया सुळे

खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेली धमकी खपवून घेतली जाणार नाही. वारंवार धमक्या देणाऱ्याला आम्ही धडा शिकवू असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. दरम्यान  इच्छुकांनी आजपासूनच विधानसभेच्या कामाला लागा अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली केली.


सुप्रिया सुळे मताधिक्याने निवडून आल्याबद्दल खडकवासला विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावतीने निष्ठावंतांची आभार  सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. सभेस  आमदार रोहित पवार ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हवेली तालुकाध्यक्ष नितीन वाघ,  माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, आम आदमी पक्षाचे निलेश जावळकर ,श्रीकृष्ण बराटे, सचिन दोडके,  काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, राहुल घुले, संदीप मते, पुनम मते, गोकुळ करंजावणे आदींसह महाआघाडीतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. अजित पवार यांनी खडकवासला मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फोन करून आपले काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  परंतु सुप्रिया सुळे यांचे काम करणाऱ्या  कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी धमक्या दिल्या होत्या. त्याची चर्चा मतदारसंघात होती. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे  प्रथमच खडकवासला मतदारसंघात आल्या होत्या. त्या म्हणाल्या,  बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेली धमकी मी खपवून घेणार नाही आणि सहनही करणार नाही. अशा वारंवार धमक्या आल्यास आपण धमकीबहाद्दरांना  धडा शिकवणार असा इशाराही त्यांनी दिला.  पुण्यात गलिच्छ राजकारण सुरू झाले असून ते थांबले पाहिजे त्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढील काहीच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत इच्छुकांनी आजपासूनच कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी या सभेत केल्या. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात पैशाची देव घेऊन झाली असल्याचा संदर्भ देत सुळे म्हणाल्या की असे असले तरी सर्वसामान्य माणूस निष्ठावान आहे जनता विकाऊ नाही हेच या निवडणुकीने दाखवून दिले आहे.
निवडणूक काळात पीडीसीसी बँक रात्रीची उघडण्यात  अल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की,  कोणतीही बँक २४ तास उघडी नसते तर ती येथील पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून उघडली गेलेली असते.  त्याची शिक्षा सर्वसामान्य कर्मचाऱ्याला होते हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.  यातील मास्टर माईंड कोण हे शोधून त्याला शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रातील  खासदारांच्या संख्येचा संदर्भ देत आमदार रोहित पवार म्हणाले की, मोदींचे सरकार  स्थापन होण्यात अनेक अडचणी आहेत. मोदी सरकार शपथ घेईल अशी चर्चा आहे. परंतु ती खरी होईल ही शक्यता फार कमी आहे. कारण भाजपच्या मित्र पक्षांना सध्या असलेले गृहमंत्री नको आहेत. त्यावरून मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो. आणि  केंद्रामध्ये सुप्रिया सुळे नक्की मंत्रिपदाला गवसणी घालू शकतात. रोहीत पवार यांनी स्पष्ट केले की, या   निवडणुकीने  दाखवून दिले आहे की,  पैसा कितीही मोठ्या प्रमाणात वापरला; दडपशाही, गुंडशाही वापरली तरी स्वाभिमान आणि निष्ठा ही सर्वात महत्त्वाची असेल हे नागरीकांनी दाखवून दिले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीचे कमीत कमी दोनशे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार असून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर  बँकेची ही निवडणूक आपण लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आत्या म्हणून तुला परवाणगी देणार नाही

निवडणुकीच्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक शाखा रात्रीची उघडी असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सदर शाखेच्या व्यवस्थापकास निलंबितही करण्यात आले आहे. रोहित पवार यांनी आपल्या भाषणात बँकेची ही निवडणूक लढवणार  असल्याचा उल्लेख केल्याने सुप्रिया सुळे यांनी भाषणात रोहित पवार यांच्या भाषणातील  बँकेची निवडणूक लढवण्याच्या संदर्भ घेत त्या रोहित पवार यांना उद्देशून  म्हणाल्या की,  तू जरूर बँकेची निवडणूक लढव परंतु कोणती शाखा २४ तास उघडी ठेवू नकोस कारण आत्या म्हणून मी तुला असे करण्यास कधीही परवानगी देणार नाही अशी उपरोधीक मिष्किल  टिप्पणी त्यांनी करताच कार्यालयात टाळ्यांचा कडकडाट झाला.

See also  प्रितम उपलप यांना पीएच. डी.