महानगरपालिकेच्या विजेच्या खांबावर अनाधिकृत केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे व आर्थिक स्वरूपाचा दंड करण्याची मागणी

औंध : ओवर हेड केबल वर कारवाई केल्यानंतर पुन्हा केबल टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत असून देखील अद्याप एकही गुन्हा अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर औंध क्षत्रिय कार्यालया अंतर्गत दाखल करण्यात आलेला नाही.

औंध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विद्युत खांबांवर असलेल्या अनधिकृत केबल सातत्याने कारवाई करून काढल्या जात आहेत. परंतु या केबल काढल्यानंतर दोनच दिवसात किंवा लगेचच चार तासात पुन्हा केबल टाकण्याचे काम अनाधिकृत केबल टाकणाऱ्यांकडून सातत्याने होते. महानगरपालिकेचे कर्मचारी अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर कोणतेही दंडात्मक कारवाई करत नसल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

विद्युत खांबांवरती अनधिकृत केबल टाकल्यामुळे काही ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या खांबांचे नुकसान झाले असून काही काम तुटल्याचे प्रकार देखील घडले आहेत. असे असताना देखील पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत नाही. आर्थिक स्वरूपाचा दंड अथवा गुन्हे दाखल होत नसल्यामुळे सातत्याने अनधिकृत केबल टाकण्याचे प्रकार घडत आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी केबल कोणाच्या आहेत याची माहिती मिळत नसल्याचे कारण देत असून पालिकेच्या खांबांवर कोणाच्या केबल आहेत याची माहिती पालिकेला मिळत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाच्या अधिकारी वैशाली भोईर म्हणाल्या, विद्युत विभागाच्या वतीने अनधिकृत केबलवर कारवाई म्हणून फक्त केबल काढण्याचे काम केले जाते. दंडात्मक कारवाई अथवा गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आम्हाला दिलेले नाहीत. तसेच खांबांवरील केबल कोणाच्या आहेत याची माहिती उपलब्ध होत नसल्याने कारवाई करता येत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या अनधिकृत केबल वरील कारवाईनंतरही पुन्हा केबल टाकणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी चे नुकसान केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करून आर्थिक दंड देखील वसूल करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न