सामाजिक जाणीव निर्मितीचा उपक्रम अधिक सशक्त करण्याची गरज-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उपक्रम अधिक सशक्त करण्यासाठी शिबिरात विचारमंथन व्हावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. एनएसएसच्या समन्वयकांनी मागील कार्याचा आढावा आणि पुढील कार्याची दिशा यावर चर्चा केल्यास विधायक कार्य उभे राहील, असा विश्वास श्री.पाटील त्यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाच्या उद्घाटन तसेच जी-२० कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुलगुरु डॉ. कारभारी काळे, भारत सरकारचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संचालक रजनीश कुमार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक प्रा. श्रीधर श्रीवास्तव, जी-२० शैक्षणिक कार्यगटाचे विशेष कार्य अधिकारी चैतन्य प्रसाद, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, यावर्षी ५ लाख १३ हजार विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाले आहेत. यात आणखी एक लाख विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न आहेत. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना जी-२० बैठकांचे महत्व समजावून सांगण्यासोबत विकसित भारत, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, एकतेचं सामर्थ्य आणि नागरिकांची कर्तव्ये आदी बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. दोन दिवसाच्या परिषदेत हे कार्य कशारितीने करता येईल यावर विचार व्हावा, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.

भारताला यावेळी जी-२० देशांच्या समुहाचे अध्यक्षपद मिळाले आहे. या अंतर्गत देशात ४० बैठका होत आहेत. राज्यात मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३ या प्रमाणे १२ बैठका होत आहेत. पुण्यात पहिली बैठक पायाभूत सुविधांच्या विकासावर आधारीत होती. दुसरी बैठक येत्या १२ आणि १३ जून रोजी पुण्यात होत आहे. यावेळी ३७ राष्ट्रांचे प्रतिनिधी यानिमित्ताने शहरात येणार आहेत. एकाचवेळी वारी आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारीत जी-२० राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे नियोजन होणार आहे. १९ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणावर आधारीत बैठक होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.


मंत्री श्री. केसरकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांनी समाजसेवेच्या माध्यमातून श्रमसंस्कार इतरांपर्यंत पोहोचवीत भारत निर्माणाच्या कार्यात सहभागी व्हावे. भारत विश्वगुरु बनण्याच्या स्वप्नपूर्तीच्यादृष्टीने कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आपली संस्कृती जगाची सेवा करणारी संस्कृती असून त्याची जाणीव लहानपणापासून झाली पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्व, शिस्तीसोबत व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या गोष्टीबाबत जागरूक राहून काम करावे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण अंगी निर्माण करावी.

शिक्षण क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे काम सुरु आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जगाची सेवा व्हावी, त्यानुसार शिक्षणपद्धतीमध्ये बदल करावे लागणार आहे, याबाबत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे. येत्या जून महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी शिक्षण विभागाच्यावतीने आवश्यक तो पुढाकार घेण्यात येईल, असेही श्री.. केसरकर म्हणाले.

शालेय शिक्षण विभागाचे सचिव श्री. कुमार म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शासकीय कार्याची माहिती तळागाळापर्यत पोहचवावी. जी-२० बैठकीच्या निमित्ताने भारतीय संस्कृती जागतिक पटलावर मांडण्याची संधी आपल्याला आहे. या बैठकीबाबत सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम योजनेच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. रस्तोगी म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज कल्याणाचे कार्य करण्यात येत आहे. याची दखल देशपातळीवर घेतली आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. आगामी शैक्षणिक वर्षात महाविद्यालयानी स्वयंसेवक नोंदणी करण्यावर भर देण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षण आयोजित करावे.

कुलगुरु डॉ. काळे म्हणाले, या अधिवेशनातून एनएनएस आणि जी-२० यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. ‘पंचप्रण’ कार्यक्रमाअंतर्गत आयोजित ‘युवा संवाद’ उपक्रमाबाबत चर्चा होणार आहे. भारत देश विश्वगुरु करण्यासाठी शिक्षणप्रणाली विकसित करावी. मानव जातीच्या कल्याणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न प्रयत्न करावे, असेही डॉ. काळे म्हणाले.

प्रस्तावित श्री. पांडे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाभिमुखकता, संवेदनशिलता, समाजसेवा, निष्ठेने काम करण्याची भावना त्यांच्याअंगी रुजविण्यात येते. योजनेचे संपूर्ण देशासह राज्यात काम सुरु असून आहे. देशाच्या विकासाचे टप्पे विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले.

See also  मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ही डीजे बंदी करावी सुनील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन