पुणे येथे उपोषणकर्त्यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

पुणे : ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपोषणकर्ते ॲड. मंगेश ससाणे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांबाबत २१ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. बैठकीत विविध मागण्यासंदर्भात सविस्तर  सकारात्मक चर्चा होऊन, काही मागण्यांबाबात निर्णय घेण्यात आले आहेत तर काही मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार सुरू आहे.

श्री. महाजन म्हणाले, येत्या काळात होणाऱ्या अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, कुणावरही अन्याय होणार नाही. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती श्री. महाजन यांनी केली.

शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. ॲड. ससाणे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार योगेश टिळेकर,  उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले आदी  उपस्थित होते.

See also  आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात आणि आनंदात साजरा