देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासात सनदी लेखापालाचे योगदान – ‘पीएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त सीए दीपक सिंगला यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’ पुणेच्या वतीने दीक्षांत सोहळा

पुणे: “सनदी लेखापाल होणे ही सुरुवात आहे. यासह इतर अनेक संधी तुम्हाला उपलब्ध असून, त्याकडेही लक्ष द्यावे. एकाच क्षेत्रात अडकून न राहता विविध कौशल्ये आत्मसात करावीत. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात सनदी लेखापालांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) अतिरिक्त आयुक्त सीए दीपक सिंगला यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे आयोजित दीक्षांत सोहळ्यात दीपक सिंगला बोलत होते. ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए रणजीत कुमार अग्रवाल, उपाध्यक्ष सीए चरणजोत सिंग यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. पुण्यासह देशातील बंगळुरू, नवी दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, जयपूर, इंदोर, गाजियाबाद, हैदराबाद, चंदिगड, लुधियाना या बारा ठिकाणी एकाच वेळी हा दीक्षांत समारंभ झाला.

कोथरूड एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहातील सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. (सीए) पराग काळकर, ‘आयसीएआय’चे केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, ‘विकासा’ चेअरमन सीए प्रणव आपटे, सीए प्रीतेश मुनोत, सीए राजेश अग्रवाल, अभ्यास मंडळाचे सदस्य सीए डॉ. एम. एस. जाधव, सीए जगदीश धोंगडे आदी उपस्थित होते.

सीए दीपक सिंगला म्हणाले, “सनदी लेखापाल झाल्यानंतर तुमच्याकडे नवनवीन गोष्टी करण्यासाठी वेळ आहे. त्याचा फायदा करून घ्या. आज देश नवनवीन गोष्टीत प्रगती करत आहे. सनदी लेखापालांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा उपयोग करून आपल्या कामात उन्नती करावी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही तुम्हाला प्रयत्न करता येईल.”

सीए डॉ. पराग काळकर म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने काम करावे. आपल्या व्यवसायात प्रामाणिक राहून देशाच्या, समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे. सीए झाल्यावर संशोधन व पीएचडी करता येते. सीए म्हणून प्रॅक्टिस करताना अध्यापनदेखील करता येते. भोवतालची माहिती घेत रहा, स्वतःला अद्ययावत ठेवा. तुमच्या कामातूनच तुमची ओळख बनते.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “भारतीय सीएना देशात व भारताबाहेर मोठी मागणी आहे. आज जवळपास सहाशेहून अधिक सीएना पदवी प्रदान केली आहे. सीए होणार्‍या महिलांचे प्रमाण वाढले आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डाॅलर होण्यात सनदी लेखापालांचा वाटा मोठा आहे. त्यांना अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. याचा तरुण सदस्यांनी लाभ घ्यावा.”

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “आपण सर्व सनदी लेखापाल म्हणून आयुष्याची नवी सुरवात करत आहेत. तुमच्या या शिक्षणाचा येणाऱ्या काळात देशाला अधिकाधिक फायदा होईल आणि या शिक्षणाच्या जोरावर तुम्ही उंच भरारी घ्याल, असा मला विश्वास आहे.”

सीए उमेश शर्मा म्हणाले, “आज विद्यार्थ्यासोबत मोठ्या संख्येने पालकही उपस्थित आहेत. सीएसारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत ‘आयसीएआय’मधून अनेकानी पहिल्या प्रयत्नात यश प्राप्त केले आहे.”

स्वागत-प्रास्ताविक सीए अमृता कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सीए प्रणव मंत्री, सीए सारिका देशपांडे, सीए रेवती मुरकुटे यांनी केले. आभार सीए सचिन मिणियार यांनी मानले.

See also  रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत पीआयसीटीच्या प्राध्यापकांचा सहभाग