ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीत सर्वतोपरी सहकार्य करु -नामदार चंद्रकांतदादा पाटील

कोथरूड : ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्राची ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राची मागणी रास्त आहे. त्यामुळे फाउंडेशन ने यासाठी जागा सुचवल्यास, त्याच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. तसेच, ज्येष्ठ कलाकारांच्या समस्यांसंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत लवकरच बैठक करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर, मेलडी मेकर्स चे अशोककुमार सराफ, ज्येष्ठ कलावंत सुनील गोडबोले, रजनी भट, जयमाला इनामदार,प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील,सुबोध चांदवडकर, इकबाल दरबार यांच्या सह संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्रांची संघटनेची मागणी अतिशय रास्त आहे. या मागणीसाठी संघटनेने जागा सुचविल्यास त्यादृष्टीने प्रयत्न करु. तसेच, त्यांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु. जेणेकरून ज्येष्ठ कलाकारांना त्यांचे उपक्रम राबविणे सहज शक्य होईल.

तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या इतरही अनेक समस्या निवेदनाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात लवकर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक घेऊन, त्याचीही सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी ज्येष्ठ कलाकारांच्या पेन्शनच्या विषयात महायुती सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत, भरघोस वाढ केल्याबद्दल महायुती सरकारचे आभार मानले. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, लक्ष्मीकांत खाबिया यांनीही मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी ज्येष्ठ कलाकारांच्या विमा कार्डचे आणि नवनियुक्त कार्यकारीणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्राचे वाटप नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

See also  गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन