विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी स्टेट बँकेचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान – बिनोदकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन; स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशनचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

पुणे, ता. २५: “विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आगामी ५ वर्षे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामध्ये स्टेट बँकेसह बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील,” असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक (मनुष्यबळ विकास) बिनोदकुमार मिश्रा यांनी केले.

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन (मुंबई मेट्रो आणि महाराष्ट्र सर्कल्स) पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते. असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीत, तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले. स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना ‘संस्थापक एल. एन. पाबळकर स्मृती सुवर्णपदक’ प्रदान करून सपत्नीक (वृषाली) सन्मानित करण्यात आले.

महालक्ष्मी लाॅन्समध्ये आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सरव्यवस्थापक अरविंदकुमार सिंग, उपमहाव्यवस्थापक हरिशकुमार राजपाल, मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित जोग, पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक सतीशकुमार, कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकजकुमार बर्नवाल, फेडरेशनचे अध्यक्ष जी. के. गांधी, सचिव डी. के. बसू, असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे, सचिव सुधीर पवार आदी उपस्थित होते.

बिनोदकुमार मिश्रा पुढे म्हणाले, “देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टेट बॅंकेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आर्थिक उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ९९ साली बँकेचा नफा ८५ कोटींचा होता, तो कित्येक हजार पटींनी वाढला आहे. त्यात या सर्व निवृत्त सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे परिश्रम, समर्पण आणि निष्ठा, यामुळेच बँकेने प्रगतीचे शिखर गाठले आहे. याची बँकेला जाणीव आहे.”

“निवृत्तीनंतर आरोग्य जपण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. निवृत्त सहकाऱ्यांच्या आरोग्यासाठी स्टेट बँक नेहमीच सकारात्मक दृष्टीने विचार करते. पेन्शन योजनेत सातत्याने सुधारणा होत आहेत. विमा योजनेचा अधिक फायदा घ्यावा. ई-फार्मसीचा पर्याय नेण्यावर, निवृत्त सहकार्यासाठी राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न व्हावेत,” असेही त्यांनी नमूद केले.

अरविंदकुमार सिंग म्हणाले, “बॅंकेचे निवृत्त सहकारी म्हणजे बँकेचे विस्तारित कुटुंब आहे. असोसिएशनचे कार्य भक्कम विश्वासाच्या पायावर उभे असून, निवृत्त सहकाऱ्यांना सर्वाधिक फायदे मिळवून देणारी बॅंक, असा लौकिक बँकेने मिळवला आहे. निवृत्त सहकाऱ्यांच्या सुविधांचा, मागण्यांचा, अडचणींचा बँकेने सदैव सकारात्मक विचार केला आहे आणि यापुढेही करीत राहील.”

सुधीर पवार यांनी असोसिएशनच्या वतीने काही मागण्यांचा उच्चार केला. निवृत्त सहकाऱ्यांना आरोग्य सुविधांसाठी दवाखाने, रुग्णालये सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. तसेच ई-फार्मसीचा पर्याय उपलब्ध नसल्याने दुर्गम भागांत अनेक समस्या आहेत.

‘बँकेमध्ये दीर्घकाळ सेवा बजावताना अनेक बुजुर्ग अधिकारी भेटले. त्यांच्याकडून अतिशय मोलाच्या गोष्टी शिकता आल्या. बँकेच्या आजच्या अभिमानास्पद वाटचालीत सर्व सहकाऱ्यांच्या योगदानाचा मोठा वाटा आहे,’ असे मनोगत गांधी यांनी मांडले.

पंकजकुमार बर्नवाल म्हणाले, ‘देशात बँकेच्या निवृत्त सहकाऱ्यांची संख्या तब्बल ३ लाखांच्या घरात आहे. पण ते असोसिएशनच्या माध्यमातून असे काम करत आहेत, की ते रिटायर्ड झाले आहेत, पण टायर्ड झालेले नाहीत, असे म्हणावेसे वाटते’.

विलास गंधे यांनी आपल्या मनोगतात पाबळकर यांच्या स्मृतीनिमित्त प्रदान केलेले सुवर्णपदक हा त्यांचाच आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. डी. के. बसू, अमित जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले. वसुधा डोंगरे आणि सॅन्ड्रा पोरे यांनी सूत्रसंचालन केले.

See also  कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन