कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक व स्वच्छ समन्वयकाचा स्वच्छता ही सेवा – २०२४ साठी थरार…..……!

कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १२, गुरुजन सोसायटी हजेरी कोठी अंतर्गत असलेल्या आशिष गार्डन चौकाजवळ सिएम प्लॉटवर ” स्वच्छता ही सेवा -२०२४ तसेच १७ सप्टेबर ते २ आक्टोबर” या स्वच्छता पंधरवडा दरम्यान कचरा पडणारे ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यासाठी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाने नव्याने नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक सलीम पठाण, साईराज दुबळे, रोहन जाधव व स्वच्छ संस्थेचे समन्वयक सोहन खिलारे यांनी कचरा पडणारे ठिकाणे नष्ट करण्यासाठी जणू पैजेचा विडाच उचलला आहे. सकाळच्या प्रहरी कचरा टाकणाऱ्यांकडून  कचरा उचलून साफ सफाई करून घेतली.

तद्नंतर दुपारी २.१५ च्या दरम्यान त्याठिकाणी हे चौघेजण कचरा पडू नये म्हणून थांबले असताना कचरा टाकणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकू नका म्हणून नम्रपणे सांगत होते. त्याप्रसंगी  ज्ञानेश्वर कॉलनीतील भाडेकरू सुबोध सुशिल कुमार नावाच्या तरूण व्यक्तीने घरातील आठ दिवसाचा सडलेला व आळ्या पडलेला दुर्गंधीयुक्त कचरा टाकत असताना दिसला. कचरा टाकणाऱ्या त्या व्यक्तीला येथे कचरा टाकू नको तो कचरा उचल असे सांगत होते. पण त्या व्यक्तीने त्यांना आरेरावीची भाषा करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या चौघांनी मोकादम वैजीनाथ गायकवाड यांना फोन करून त्वरित माहिती दिली असताना घटना स्थळी बोलावून घेतले आणि त्यांनी त्याला समजावून सांगितले आणि दंडाची पावती करण्यास सांगितले.

पण त्याच्या खिशात दंड भरण्यास पैसे नव्हते म्हणून त्याला शिक्षा म्हणून कान पकडून उठाबशा काढण्याची व कचरा उचलून नेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या व्यक्तीने चिडून थांबलेल्या प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक व स्वच्छ समन्वयक यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी तात्काळ १०० नंबर वर फोन करून शास्त्री नगर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस स्टेशनचे ठाणे अमंलदार विशाल चौगुले यांनी त्वरित दखल घेऊन त्याठिकाणी पोलीस पाठवले त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले. सदर घटनेतील प्रसंग प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक यांनी पोलीसांना सविस्तर माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी सुबोध कुमार यास पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर गयावया करून पाया पडून माफी मागितली. शिवाय पोलीसांनी देखील शिक्षा म्हणून हातात झाडू देऊन आवार स्वच्छ करण्यास भाग पाडले व योग्य ती समज देऊन त्या व्यक्तीला सोडून दिले. सदर कचरा पडणारी ठिकाणे बंद करण्यास महापालिका आयुक्त व घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त शंकर दुदुस्कर, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कचरा पडणारी ठिकाणे बंद करण्यास आरोग्य निरिक्षक रुपाली शेडगे, सचिन लोहकरे, करण कुंभार मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, संजय कांबळे तसेच स्वच्छता कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक शिवाय स्वच्छ संस्थेचे समन्वयक परिश्रम घेत आहेत.

See also  खाजगी शाळांतील आरटीई प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करा: आम आदमी पार्टी